आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:19 AM2021-06-17T04:19:31+5:302021-06-17T04:19:31+5:30
तासगाव : राष्ट्रवादीचे पंचायत समितीचे सदस्य आणि माजी उपसभापती संभाजी पाटील यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. माझ्यावरील आरोप ...
तासगाव : राष्ट्रवादीचे पंचायत समितीचे सदस्य आणि माजी उपसभापती संभाजी पाटील यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास सदस्यत्वाचा राजीनामा देऊ, असे आव्हान भाजप पंचायत समिती सदस्य संतोष आठवले यांनी दिले. ते पत्रकार बैठकीत बोलत होते.
संतोष आठवले म्हणाले, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा पंचायत समिती प्रशासनावर कोणताही वचक नाही. तालुक्यात उठावदार काम नाही. तालुक्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंतची माणसे त्यांच्या कामासाठी आठ आठ दिवस हेलपाटे मारतात मात्र काम होत नाही. त्यांनी कुणाला भेटायचे असल्यास पदाधिकारी सदस्य जागेवर नसतात. मात्र मी जास्त वेळ देऊन याचा जाब विचारत असल्याने प्रशासनालाही ते आवडत नाही. निविदा मॅनेज करायला मी ठेकेदार नाही. ऑनलाईन टेंडर कोणीही भरू शकते. ते मॅनेज करण्याचे अधिकार ग्रामसेवक यांनाही नाहीत. कवठे एकंद गावात चार महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आली आहे. अजून कोणतेही निविदा प्रसिध्द झाली नाही. कुणाला शंका असतील तर ऑडिट करत कागदोपत्री सिद्ध करण्याचा आव्हान त्यांनी दिले. प्रशासन कसे चुकीचे चालतेय याचे कागदपत्रांसह पुरावे लवकरच देण्याचे त्यांनी सांगितले.
चौकट
राष्ट्रवादीच्या सत्तेतच सहा ग्रामसेवक बदलले
गेल्या चार वर्षांत कवठे एकंद ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता होती. यातील चार ग्रामसेवकांच्या बदल्या झाल्या तर दोन ग्रामसेवक निलंबित झाले. पोलिसांकडून सरपंच व ग्रामसेवक फरार असे जाहीर केले होते. या सर्व प्रक्रियेत सत्ता राष्ट्रवादीची होती याची माहिती सदस्य संभाजी पाटील यांनी घेण्याची गरज आहे, अशी माहिती आठवले यांनी दिली.