डास मरत नसतील तर औषध काय कामाचे?

By admin | Published: May 26, 2017 11:10 PM2017-05-26T23:10:19+5:302017-05-26T23:10:19+5:30

डास मरत नसतील तर औषध काय कामाचे?

If the mosquitoes are not dying then what is the medicine? | डास मरत नसतील तर औषध काय कामाचे?

डास मरत नसतील तर औषध काय कामाचे?

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मोकाट कुत्री, डुकरे, जागोजागी पडलेला कचरा, डासांचे वाढते साम्राज्य या विषयांवरून गुरुवारी महापालिकेच्या नगरसेवकांनी आरोग्य विभागाचा पंचनामा केला. डासांच्या औषध खरेदीत बनवेगिरी असून, डास मरत नसतील तर हे औषध काय कामाचे? असा सवाल खुद्द महापौर हारूण शिकलगार यांनीच बैठकीत उपस्थित केला. तसेच मोकाट कुत्री पकडण्यासंदर्भात आठवड्याला अहवाल देण्याचे आदेश त्यांनी दिले.
गत महासभेत नगरसेवकांनी कचरा उठाव, मोकाट कुत्री या विषयावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर महापौर शिकलगार यांनी स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुरुवारी महापालिकेच्या सभागृहात आरोग्यकडील वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, मुकादम यांची बैठक झाली. या बैठकीला स्थायी समिती सभापती संगीता हारगे, उपायुक्त सुनील पवार उपस्थित होते.
बैठकीनंतर महापौर शिकलगार म्हणाले की, पालिकेच्या चार प्रभागांना डॉक्टरांची स्वच्छता अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. पण त्यांची जबाबदारी काय, हेच नगरसेवकांना माहीत नाही. स्वच्छतेबाबत नागरिक नगरसेवकांकडे तक्रारी करतात. त्यामुळे संबंधित निरीक्षक आणि मुकादमांनी दररोज नगरसेवकांना भेटावे. नगरसेवकांकडून सूचना घेऊन कामे करावीत. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली जाईल. महापालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांचा उच्छाद झाला आहे. त्यासाठी पहाटे साडेचार ते सात आणि रात्री नऊ ते अकरा या वेळेत कुत्री पकडण्याची मोहीम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचा अहवाल उपायुक्त व आपणाला देण्याची सूचना केली आहे.
तीन महिने कचरा उठाव नसल्याची तक्रार
बैठकीत माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी, त्यांच्या प्रभागात तीन महिन्यापासून कचरा उठाव झाला नसल्याचे सांगितले. राजू गवळी यांच्यासह अनेक नगरसेवकांनी, डास फवारणी औषधांचा दर्जा आणि त्यांच्या खरेदीतही बोगसगिरी असल्याचे आरोप केले. याप्रकरणी औषधे खरेदीचा लेखाजोखा सादर करण्याचेही आदेश देण्यात आले. शहरात चिकनचे गाडे आणि कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यांचा अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले.

Web Title: If the mosquitoes are not dying then what is the medicine?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.