Sangli: पाणी देणार नसाल, तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या; कवठेमहांकाळचे शेतकरी आक्रमक
By संतोष भिसे | Published: April 19, 2024 06:11 PM2024-04-19T18:11:45+5:302024-04-19T18:13:11+5:30
अग्रणी नदी बारमाही झाल्यास गावे दुष्काळमुक्त होतील
महेश देसाई
कवठेमहांकाळ : पाणी देणार नसाल, तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या अशी मागणी कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. म्हैसाळ व टेंभू सिंचन योजनेचे पाणी अग्रणी नदीत सोडावे यासाठी ते आक्रमक झाले आहेत.
सिंचन योजनांचे कालवे सध्या तुडुंब भरून वाहत आहेत. तालुक्याची जीवन वाहिनी असलेली अग्रणी नदी मात्र कोरडीठाक पडली आहे. घाटमाथ्यावर टेंभू सिंचन योजना वाहत असून गावे कोरडी पडली आहेत. योजना असूनही गावांना फायदा नाही, त्यामुळे अग्रणीकाठचे तहानलेले शेतकरी अग्रणी नदीत आंदोलन करताना दिसत आहेत.
अग्रणी नदी खोऱ्यात मळणगाव, शिरढोण, मोरगाव, विठुरायाचीवाडी, हिंगणगाव, अग्रण धुळगाव, लोणारवाडी अशी गावे आहेत. अग्रणी नदी बारमाही झाल्यास गावे दुष्काळमुक्त होतील. त्याचबरोबर हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येईल. फळशेती, फुलशेतीबरोबर भाजीपाल्याचा शेती व्यवसाय हायटेक बनवत आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. पण पाणी सोडण्याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप तेथील शेतकरी करताना दिसत आहेत.
पाटबंधारे विभागाला अग्रणी नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी केली; परंतु ते दुर्लक्ष करत आहेत. काही दिवसांत पाणी अग्रणीला नाही सोडले, तर आंदोलन करणार आहोत. -प्रिया सावळे, सरपंच, हिंगणगाव
म्हैसाळ योजनेच्या पाण्याने धुळगावमधील बंधारे भरून मिळावेत यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले. पण दखल न घेतल्यामुळे आम्ही सर्व सदस्य व ग्रामस्थांना अग्रणी नदीमध्ये उपोषण करावे लागले. पुन्हा आंदोलनाची वेळ येऊ नये. - शिवदास भोसले, सरपंच, अग्रण धूळगाव
लोणारवाडी गावाने दुष्काळाच्या झळा खूप सोसल्या आहेत. शासनाने अग्रणी नदीला पाणी सोडावे, अन्यथा आम्हाला कर्नाटक राज्यात सामील होण्यासाठी परवानगी द्यावी. -अजित खोत, सरपंच, लोणारवाडी