खासगी वाहनांवर ‘पोलिस’ लिहाल तर कारवाई, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 05:44 PM2024-08-12T17:44:45+5:302024-08-12T17:45:49+5:30
सांगली : कर्तव्यावर असताना ‘खाकी’चा रूबाब दाखवणारे काही पोलिस खासगी वाहनांतून फिरताना ‘ पोलिस’ असा फलक गाडीवर लावून फिरताना ...
सांगली : कर्तव्यावर असताना ‘खाकी’चा रूबाब दाखवणारे काही पोलिस खासगी वाहनांतून फिरताना ‘पोलिस’ असा फलक गाडीवर लावून फिरताना दिसतात. परंतु खासगी वाहनातून फिरताना ‘पोलिस’ असल्याचे स्टीकर, प्लेट किंवा बोधचिन्ह लावून फिरता येणार नाही. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई येथून आदेश देण्यात आला आहे.
पोलिस दलाच्या गाडीतून फिरताना पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचा एक वेगळा रूबाब असतो. त्यांना मान, सन्मान मिळतो; परंतु पोलिस कर्तव्यावरून उतरल्यानंतर खासगी जीवनात वावरतानाही पोलिसांना ‘खाकी’ची नशा सोडवणे कठीण जाते. खासगी जीवनातदेखील आपल्याला तोच मान सन्मान मिळावा, अशी अनेकांना अपेक्षा असते. कुटुंबासमवेत किंवा स्वत: खासगी कामानिमित्त गाडीतून जाताना आपल्याला कोणी अडवू नये, कोणीही कागदपत्रांची विचारणा करू नये, असे वाटत असते.
जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यांत गेल्यानंतर तसेच अन्य राज्यांत गेल्यानंतरही आपण पोलिस असल्यामुळे अडवले जाऊ नये, असे वाटते. त्यामुळे अनेकजण खासगी गाडीवर पोलिस असल्याचे स्टीकर लावतात. काही जण पुढच्या भागात काचेजवळ पोलिस असल्याचा छोटा फलक दिसेल, असा ठेवतात. काही जण गाडीवर थेट बोधचिन्हही वापरतात. परंतु मोटार वाहन अधिनियमानुसार, असे लिहिता येत नाही. याबाबत पूर्वीही परिवहन विभागाने निर्देश दिले आहेत.
विकी जाधव नामक तक्रारदाराने राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी खासगी वाहनांवर पोलिस बोधचिन्ह तसेच पोलिस लिहिणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत तक्रार केली. त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागाने तक्रारीची दखल घेत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
‘महाराष्ट्र शासन’ लिहिल्यास कारवाई
खासगी वाहनांवर पोलिस बोधचिन्ह तसेच पोलिस लिहिता येत नाही. त्याचबरोबर खासगी वाहनांवर ‘महाराष्ट्र शासन’ असेही लिहिता येत नाही. त्यामुळे ‘पोलिस’ आणि ‘शासन’ असे लिहिणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक यांनी कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत.