दहा दिवसांत कमान न बांधल्यास पुन्हा तीव्र आंदोलन, बेडगप्रश्नी आंबेडकरी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 04:31 PM2023-09-02T16:31:19+5:302023-09-02T16:33:38+5:30
बेडग ग्रामपंचायत बरखास्त करण्याची मागणी
सांगली : बेडग (ता. मिरज) येथील स्वागत कमानीविरोधात ठरावाच्या निर्णयाविरोधात आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. येत्या दहा दिवसांत कमानीचे प्रत्यक्ष काम सुरू न झाल्यास पुन्हा एकदा माणगाव ते मंत्रालय असा लॉगमार्च काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या माेर्चात समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बेडग (ता. मिरज) येथे स्वागत कमान उभारण्यावरून संघर्ष निर्माण झाला होता. यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गावात ग्रामसभा घेऊन यावर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या हाेत्या. त्यानुसार झालेल्या ग्रामसभेत कोणत्याच महापुरूषांची स्वागत कमान न करण्याचा ठराव घेण्यात आला. या ग्रामसभेवर गावातील आंबेडकरी समाजाने बहिष्कार टाकला होता.
या ठरावाचा निषेध करण्यासाठी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली. माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले व मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
येत्या दहा दिवसांत बेडग येथील स्वागत कमानीचे काम सुरू न झाल्यास पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यात यापूर्वी गावातून आंबेडकरी समाज घरातून बाहेर पडले होते. आताही सर्व समाजाच्या वतीने लाँगमार्च काढण्याचा इशारा देण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माणगाव येथून आता लाँगमार्च काढत मंत्रालयावर धडक मारण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देऊनही गावचे सरपंच आणि इतर पदाधिकारी त्याची अंमलबजावणी करत नसतील तर याबाबत फडणवीस यांनीच यावर आदेश द्यावेत, असेही यावेळी आंदोलकांनी मागणी केली.
जिल्ह्यातील व मिरज तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप करण्यात आला. डॉ. महेशकुमार कांबळे यांच्यासह सर्व संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
बेडग ग्रामपंचायत बरखास्त करा
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसभेचे आदेश दिले. कोणाच्या दबावाखाली हा निर्णय देण्यात आला याची चौकशीची मागणी करत बेडग येथील ग्रामपंचायत बरखास्त करण्याचीही मागणी यावेळी कांबळे यांनी केली.