कोयनेचे पाणी बंद केल्यास धरणाचे दरवाजे तोडणार, संजय विभूते यांचा इशारा
By संतोष भिसे | Published: December 8, 2023 05:53 PM2023-12-08T17:53:09+5:302023-12-08T17:57:32+5:30
विटा : कोयनेतील पाणीसाठा आजवर अनेकदा कमी झाला आहे. पण, यापूर्वीच्या साताराच्या कोणत्याही पालकमंत्र्यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतली नाही. परंतु, ...
विटा : कोयनेतील पाणीसाठा आजवर अनेकदा कमी झाला आहे. पण, यापूर्वीच्या साताराच्या कोणत्याही पालकमंत्र्यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतली नाही. परंतु, आताचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा का केला आहे ? सांगली जिल्ह्यासाठी सोडण्यात येणारे पाणी सोमवारपासून बंद केल्यास हजारो शेतकऱ्यांसह कोयनेवर जाऊन धरणाचे दरवाजे तोडू, असा इशारा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी सरकारला दिला.
यावेळी एकाच सरकारमध्ये असलेले पालकमंत्री देसाई, खासदार संजय पाटील व आमदार अनिल बाबर यांची मिलीभगत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी केला. विटा येथे शुक्रवारी राष्ट्रवादी कॉँग्रेस व शिवसेनेची (उबाठा) संयुक्त पत्रकार परिषद झाली. कोयना धरणातूनसांगलीसाठी सोडण्यात येणारे पाणी सोमवार, ११ डिसेंबरपासून बंद हाेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख विभूते व राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष ॲड. मुळीक यांनी भूमिका मांडली.
विभूते म्हणाले, सरकारवर नाराज असलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी कोयना धरणातील पाण्याचा प्रश्न विनाकारण निर्माण केला जात आहे. वास्तविक कोयनेतील पाण्यावर सातारा जिल्ह्यातील जलसिंचन योजना अवलंबून नाहीत. मंत्री देसाई यांना सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एवढा पुळका असेल तर त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या जिल्ह्यातील जलसिंचन योजना पूर्ण कराव्यात. कृष्णा नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी बंद केल्यास शेतकरी स्वत: हातात कुदळ, पाटी, खोरे, टिकाव घेऊन कोयना धरणाचे दरवाजे तोडतील.
राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक म्हणाले, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत प्रकल्पीय तरतूद कपात करून नव्याने पाणी वापर करण्याबाबत समितीने सुचविलेली पाणी कपात अन्यायकारक आहे. सन १९६८ पासून २०१५ पर्यंत अनेकदा कोयनेतील पाणीसाठा कमी झाला होता. तरीही सांगली जिल्ह्याला कधीही पाणीटंचाई निर्माण झाली नाही. कोणतीही योजना बंद पडली नाही किंवा वीज कपातही करावी लागली नाही. मग, आताच हा प्रश्न का निर्माण झाला आहे. यात मंत्री देसाई, खासदार संजय पाटील व आमदार अनिल बाबर यांची मिलीभगत असून, जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा हस्तक्षेप थांबवावा व शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करावा.
या पत्रकार परिषदेस सुशांत देवकर, किसन जानकर, ॲड. संदीप मुळीक, विशाल पाटील, संतोष जाधव, सुवर्णा पाटील, महेश फडतरे, सागर कदम उपस्थित होते.