Sangli: रविवारी ऊस दराचा निर्णय न झाल्यास एकही कारखाना चालू देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 12:27 PM2023-11-25T12:27:33+5:302023-11-25T12:29:08+5:30
लुंग्या-सुंग्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही, सदाभाऊ खोत यांना टोला
सांगली : कोल्हापूरच्या फॉर्म्युल्यानुसार सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दर जाहीर करुन गळीत हंगाम सुरु करावेत. या निर्णयासाठी कारखानदारांना रविवार दि. २६ रोजी पर्यंतची मुदत दिली आहे. या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाला नाही तर जिल्ह्यात एकाही कारखान्याचा गळीत हंगाम चालू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.
राजू शेट्टी म्हणाले, मागील हंगामात गाळपास गेलेल्या उसाला ज्या कारखान्यांनी प्रतिटन तीन हजार रुपये दिले आहेत, त्या कारखान्यांनी ५० रुपये जादा द्यायचे आहेत. तसेच ज्या कारखान्याची एफआरपीच तीन हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कारखान्यांनी १०० रुपये जादा द्यायचे आहेत. तसेच चालू गळीत हंगामासाठी एफआरपी अधिक १०० रुपये द्यायचे आहेत. या फॉर्म्युल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी संमती दिल्याने ऊस दराबाबत सुरू असलेली कोल्हापूर जिल्ह्यातील कोंडी फुटली.
सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी हाच फॉर्म्युला स्वीकारावा. त्याच्यापेक्षा जास्त दिले तर हरकत नाही. कारखानदारांची रविवारी बैठक होणार आहे. त्यात निर्णय झाला तर चांगले आहे. अन्यथा जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याचा गळीत हंगाम चालू देणार नाही. सर्व वाहने अडविण्यात येणार असून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटित आंदोलन करुन कारखानदारांना धडा शिकवतील, असा इशाराही त्यांनी दिला. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली मध्ये येऊ नये. मुख्यमंत्र्यांच्या संमतीने हा फॉर्म्युला तयार झाला आहे.
जिल्ह्यात उसाचे मुख्य उत्पादन आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी तोडगा काढावा. घरातील पोर एकमेकांच्या उरावर बसले असताना पालकाची जबाबदारी आहे की नाही मध्यस्ती करायची, असा सवालही शेट्टी यांनी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांना केला.
लुंग्या-सुंग्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही, सदाभाऊ खोत यांना टोला
गेल्या २० वर्षांपासून हा आरोप माझ्यावर होतोय. एका हाकेवर हजारो लोक रस्त्यावर उतरतात, हेच माझे सर्टिफिकेट आहे. कुण्या लुंग्या-सुंग्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही. सदाभाऊ काय म्हणतोय त्यावर उत्तर द्यायला मी आलो नाही. माझे कार्यकर्ते त्याला उत्तर देतील. माझे कार्यकर्ते त्याच्यापेक्षा मोठे असल्याचा टोला माजी खा. राजू शेट्टी यांनी लगावला.
पालकमंत्र्यांची निवड डीपीसीचा फंड वाटायला झाली का
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, त्यांची जबाबदारी आहे. जिल्ह्याचे सध्या ऊस हेच मुख्य पीक बनले आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. जिल्ह्याचे प्रश्न सुटत नसतील तर काय फक्त डीपीसीचा फंड वाटायला त्यांची निवड झाली काय, असा सवाल राजू शेट्टी यांनी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे नाव न घेता उपस्थित केला.