समान नागरी कायदा:..तर त्याचे दुष्परिणाम भाजपला भोगावे लागतील, माजी मंत्र्यांने व्यक्त केलं मत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 06:22 PM2022-11-03T18:22:37+5:302022-11-03T18:23:58+5:30
परंतु त्यांच्यातील ९० टक्के समाज अजूनही अज्ञान, दारिद्र्य याचे चटके सोसतच आपले जीवन व्यतीत करत आहे.
इस्लामपूर : भारतीय जनता पार्टीने देशात समान नागरी कायदा आणला तर तो भाजपलाच अहिताचा होईल. हा कायदा आणला गेला तर भाजपला पुन्हा सत्तेवर यायला किती वर्षे घालवावी लागतील याचा सुज्ञांनी विचार करावा, असे मत माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डांगे यांनी एका वाहिनीवरील कार्यक्रमात भाजपचा कार्यकर्ता म्हणून बोलणाऱ्या गृहस्थांनी केलेल्या ‘भारतीय जनता पार्टीने समान नागरी कायदा आणावा, तो त्यांना फायद्याचा ठरेल’ अशा वक्तव्याचा हवाला दिला आहे.
डांगे यांनी म्हटले आहे की, घटनाकारांनी ज्या कारणामुळे समाजातील अनुसूचित जाती-जमाती व मागासांच्या विशेष प्रवर्गासाठी आरक्षण निर्माण केले, त्याचे मुख्य कारण आज ज्यांना आरक्षणाचा फायदा मिळतो त्या जातीजमातींचे मागासलेपण लक्षात घेऊन त्यांना आरक्षण दिले होते. आरक्षणाचा फायदा घेऊन ५-१० टक्के लोकांचेच जीवनमान कदाचित सुधारले आहे, असे म्हणता येईल. परंतु त्यांच्यातील ९० टक्के समाज अजूनही अज्ञान, दारिद्र्य याचे चटके सोसतच आपले जीवन व्यतीत करत आहे.
ही वस्तुस्थिती नजरेआड करून भाजपने समान नागरी कायदा करून मागास समाजाला आरक्षणाच्या फायद्यापासून वंचित ठेवले, तर त्याचे उलट पडसाद उमटून आरक्षणाचे कवच असलेला हा मागासलेला समाज भाजपच्या विरोधात जाऊन त्याचे दुष्परिणाम सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला भोगावे लागतील. पक्षाची पुुन्हा सत्तेवर येण्याची संधी गमवावी लागेल, हे उघड सत्य दृष्टीआड करून चालणार नाही.
महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षण मागतोय, त्यांना तुम्हास आरक्षण मिळणार नाही, अथवा त्यापुढे जाऊन मराठा समाज प्रगत आहे. त्यास आम्ही आरक्षण देणार नाही, असे भाजपचा कोणी नेता अथवा राज्यकर्ते म्हणू शकत नाहीत. उलट मराठा समाजाला तात्पुरते का होईना बरे वाटण्यासाठी आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी भाजपचे राज्यकर्ते सकारात्मकपणाचा उसना आव आणत आहेत, असेही प्रसिद्धीपत्रकात डांगे यांनी म्हटले आहे.