सहल, ग्रुपचे बुकिंग असेल, तर रेल्वे जादा वेळ थांबणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 13:37 IST2025-03-06T13:36:44+5:302025-03-06T13:37:02+5:30
सांगली : येथील रेल्वे स्थानकावर बहुतांश रेल्वे गाड्यांना तीन मिनिटांचा थांबा दिला आहे. त्यामुळे सांगलीतून बसणे सोयीचे असतानाही अनेक ...

सहल, ग्रुपचे बुकिंग असेल, तर रेल्वे जादा वेळ थांबणार
सांगली : येथील रेल्वे स्थानकावर बहुतांश रेल्वे गाड्यांना तीन मिनिटांचा थांबा दिला आहे. त्यामुळे सांगलीतून बसणे सोयीचे असतानाही अनेक ग्रुपचे लोक मिरजेत किंवा अन्य स्थानकातून गाडी पकडतात. मात्र, वेळापत्रकात कमी वेळ असला तरीही संपूर्ण ग्रुप बसेपर्यंत सांगलीत रेल्वे थांबणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सांगलीतील एका ग्रुपने त्यांच्या बुकिंगची समस्या पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी ग्रुपचे उमेश शहा यांच्याकडे मांडली. तीन मिनिटांसाठी सांगलीत गाडी थांबणार असेल, तर सर्व ग्रुपला रेल्वेत चढण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही, अशी शंका त्यांनी उपस्थित केली. शहा यांनी याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद दिला. कितीही लोकांचा ग्रुप असला, तरी त्यांचे सर्व सदस्य रेल्वेत बसेपर्यंत कोणतीही रेल्वे सुटणार नाही, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे शहा यांनी अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले.
सांगलीत ग्रुप बुकिंग शक्य
ग्रुप सहलीसाठी ५० ते ५०० प्रवाशांचे मोठे ग्रुप देखील सांगली स्थानकावरून आता रेल्वे तिकिटे काढू शकतील. सांगली स्टेशनवरूनच ते गाडीत बसू शकतील. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून सांगली रेल्वे स्टेशनवरून ग्रुप सहलीच्या प्रवाशांना सहकार्य करण्याचे आश्वासन मिळाले आहे.
ग्रुप बुकिंगचे प्रमाण वाढले
उन्हाळी सुट्ट्या सुरू होत असल्याने शाळा कॉलेजच्या सहली, लग्न सोहळे, धार्मिक कार्यासाठी तीर्थस्थळ जाणाऱ्या प्रवाशांचे ग्रुप आतापासून रेल्वे तिकिटांचे बुकिंग करीत आहेत. ५० ते २०० जणांचे ग्रुप तिकिटांचे बुकिंग करीत आहेत.
सांगली सोयीचे, पण तिकीट मिरजेचे
सांगली, बुधगाव, कवलापूर, बिसूर, सांगलीवाडी, कसबे डिग्रज, तुंग, आष्टा येथील प्रवाशांना सांगली रेल्वे स्थानक सोयीचे व जवळचे आहे. तरीही सांगलीत अनेक गाड्या तीन मिनिटासाठी थांबत असल्याने ग्रुप बुकिंग करणारे बहुतांश लोक मिरजेतून तिकिट काढत होते. आता त्यांना सांगलीत रेल्वेत बसण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.
ग्रुप सहलीला जाणाऱ्या प्रवाशांनी सांगली रेल्वे स्थानकावरून तिकीट काढावे व बोर्डिंग स्टेशन सांगली टाकावे. अशा ग्रुपच्या सदस्याने स्थानकावर आल्यानंतर स्थानक व्यवस्थापक किंवा कोणत्याही अधिकाऱ्यास ग्रुपबाबत कल्पना दिल्यास त्यांना रेल्वेत बसण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी ग्वाही दिल्याने ग्रुपने जाणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. - उमेश शहा, पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी ग्रुप