वेळ पडल्यास बंदुका हातात घेऊ
By admin | Published: October 2, 2016 01:08 AM2016-10-02T01:08:09+5:302016-10-02T01:08:09+5:30
पाकिस्तानला धडा शिकवा : माजी सैनिकांचे सरकारला आवाहन
सांगली : उरी हल्ल्यानंतर भारताने जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मिरातील तळांवर हल्ले करून दहशतवाद्यांचा खात्मा केला. सरकारने आता माघार न घेता पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे. गरज पडल्यास भारतीय सैन्याला मदत करण्यासाठी आम्ही बंदुका हातात घेऊन लढण्यास तयार आहोत. जिल्ह्यातील १८ हजार सैनिक सीमेवर जाण्यास तयार आहेत, असे शनिवारी पत्रकार परिषदेत माजी सैनिकांनी सांगितले. यासाठी शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
माजी सुभेदार हरिभाऊ शिंदे म्हणाले की, मी सैन्यदलामध्ये २६ वर्षे नोकरी केली आहे. ज्या उरीमध्ये अतिरेक्यांनी सैन्यदलावर हल्ला केला होता, तेथे बारा वर्षे सेवा झाली आहे. पाकिस्तानकडून वारंवार नियंत्रण रेषेचे उल्लंघन होत असताना आम्हाला त्यांच्याविरुध्द लढण्याची परवानगी मिळत नव्हती. यामुळे भारतीय सैन्य चिडून होते. उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे सात लाँचपॅड उद्ध्वस्त करण्यासाठी सैन्याला आदेश दिला. यामुळे निश्चितच सैनिकांचे मनौधैर्य वाढण्यास मदत होणार आहे. सरकारच्या भूमिकेला आणि सैन्याला पाकिस्तानबरोबर लढण्यासाठी बळ मिळावे, यासाठी सांगली जिल्ह्यातील हजारो माजी सैनिक पुन्हा सीमेवर जाण्यास तयार आहेत.
सुभेदार संभाजी पवार म्हणाले की, आम्हाला राजकारणात पडायचे नाही, पण सैन्याच्यादृष्टीने बऱ्याच वर्षातून प्रथमच चांगला निर्णय भारत सरकारने घेतला आहे. पाकिस्तानकडून होणारे हल्ले किती दिवस पाहात बसायचे? कधी तर त्यांना धडा शिकवण्याची गरज होतीच. ते धाडस नरेंद्र मोदी यांनी दाखविले आहे. शिवाय आम्ही सीमेवर लढण्यास तयार आहोत.
शमशुद्दीन नदाफ म्हणाले की, पाकिस्तानच्या भूमीत जाऊन तेथील दहशतवाद्यांचा खात्मा केल्यामुळे निश्चितच भारतीय सैनिकांचे मनोबल वाढणार आहे. भारतीय सैन्य सीमेवर गेलेच आहे, तर पाकिस्तानला धडा शिकवूनच परत आले पाहिजे. यासाठी आम्ही त्या सैन्याच्या खांद्याला खांदा लावून लढण्यास तयार आहोत.
यावेळी दिलावर आत्तार, बाळासाहेब पवार, शिवाजी पवार, महादेव कोळी, गोरखनाथ जमदाडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांना ७ रोजी निवेदन देणार
सैनिकांच्या कारवाईला पाठिंबा देण्यासाठी आणि प्रसंगी आम्ही सिमेवर जाण्यास तयार आहोत, याबाबतचे निवेदन शुक्रवार, दि. ७ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील माजी सैनिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे, असे आवाहन शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदादा पाटील व माजी सैनिक बाळासाहेब पवार यांनी केले आहे.