भाजीपाला बाजारात विकणारच नसेल, तर पिकवायचा कशाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:29 AM2021-05-25T04:29:53+5:302021-05-25T04:29:53+5:30
सांगली : बाजारात विकणारच नसेल, तर पिकवायचं कशासाठी, असा सवाल करत शेतकऱ्यांनी भाजीपाला व फळांच्या उत्पादनाला तूर्त विश्रांती दिली ...
सांगली : बाजारात विकणारच नसेल, तर पिकवायचं कशासाठी, असा सवाल करत शेतकऱ्यांनी भाजीपाला व फळांच्या उत्पादनाला तूर्त विश्रांती दिली आहे. लॉकडाऊनमुळे सव्वा वर्षे बाजार बंद आहेत, त्यामुळे ऊसासारख्या अन्य पिकांना पसंती दिली आहे.
मिरज, वाळवा, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यांत मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकतो. तो पुणे, मुंबई, बेंगलोर, दिल्ली, हैदराबाद आदी शहरांना पाठवला जातो. ढबू मिरची, बेबी कॉर्न, परदेशी भाज्यांची निर्यात मोठी आहे. गेले सव्वा वर्ष देशभरातील बाजार बंद असल्याने निर्यात थांबली आहे.
कोथिंबीर, मेथी, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, काकडी, वांगी या कमी दिवसांत पैसा मिळवून देणाऱ्या भाज्या हजारो एकरात केल्या जातात. मिरज तालुक्यात लिंगनूर, चाबुकस्वारवाडी, बेळंकी, जानराववाडी या सीमाभागातील गावांत प्रत्येक शेतकरी किमान गुंठाभर तरी भाज्या पिकवतो; पण लॉकडाऊनमध्ये भाजीपाला फेकून द्यावा लागला. टोमॅटो, कलिंगडे, वांगी रस्त्याकडेला कुजली. जनावरांनाही घातली. कोरोना संपण्याची निश्चिती नसल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे प्लॉट रिकामेच ठेवले. उन्हाळी भाज्या यंदा दिसल्याच नाहीत. फक्त कांदा, बटाटा, कोबी व ढबू मिरची बाजारात उपलब्ध झाली.
चौकट
ऊस, द्राक्षाचा मार्ग सुकर
द्राक्षाचे सलग दोन हंगाम लॉकडाऊनमध्ये येऊनही सुखरूप निसटले. गतवर्षी हंगाम संपतेवेळी कोरोनाने उचल खाल्ली. यंदादेखील जानेवारी ते एप्रिलपर्यंत कोरोना सौम्य होता, त्यामुळे हंगाम पार पडला. ऊसालादेखील अडचण आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रिकामी राने ऊस, द्राक्षाखाली घेतली आहेत.
चौकट
यांचे उत्पादन रोडावले
भाजीपाला, फळभाज्या, फळे यांचे उत्पादन रोडावले आहे. मोठ्या शहरांत जाणाऱ्या ढबू, कोबी, फ्लॉवरचे फड रिकामे आहेत. स्थानिक बाजारपेठेतील वांगी, दोडका, कारली यांना विश्रांती मिळाली आहे. शेती उसाखाली घेऊन शेतकरी बाजारपेठ सुरळीत होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
कोट
कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भाजीपाल्याचे उत्पन्न हमखास पैसा देणारे ठरते. लॉकडाऊनमध्ये मंडई, आठवडी बाजार बंद असल्याने भाज्या विकल्या गेल्या नाहीत. त्यांचे खत करावे लागले. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर्त भाजीपाल्याला विश्रांती दिली आहे.
- दादासाहेब काळे, भाजीपाला उत्पादक शेतकरी, चाबुकस्वारवाडी