पाणी योजना पूर्ण न केल्यास टाळे ठोकू
By admin | Published: November 6, 2014 10:55 PM2014-11-06T22:55:08+5:302014-11-06T22:56:22+5:30
आर. आर. पाटील : जीवन प्राधिकरण विभागाला इशारा
तासगाव : तासगाव शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी पाणी पुरवठा टप्पा क्र. ३ ही योजना ३0 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण झाली नाही, तर जीवन प्राधिकरणच्या कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आर. आर. पाटील यांनी आज (गुरुवारी) तासगावात दिला.
येथील पंचायत समितीच्या सभापती दालनात रखडलेल्या पाणी योजनेबाबतची माहिती आ. पाटील यांनी जीवन प्राधिकरणचे अधिकारी, नगरपरिषदेचे प्रशासन यांच्याकडून घेतली. २0११ मध्ये ही योजना पूर्ण व्हायला हवी होती. पालिकेत नगरसेवकांनी जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना कोंडून घालण्याचा प्रकारही केला होता.
सरकारच्या यु.आय.डी.एस. एस. एम. टी. या योजनेंतर्गत या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी आहे. सुमारे २१ कोटी खर्चाची ही योजना अद्याप का पूर्ण झाले नाही, याबाबतची विचारणा आ. पाटील यांनी केली. निधीची अडचण, शासनस्तरावर पाईप्स खरेदीचा विषय वेळेत झाला नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावर आर. आर. आबांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. २१ कोटींच्या योजनेला आतापर्यंत १७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यातील १५ कोटी रुपये खर्च झाले आहेत, २ कोटी रुपये शिल्लक आहेत. अद्याप पाईप्सच्या आॅर्डर दिलेल्या नाहीत. तेव्हा या योजनेबाबत गांभीर्याने लक्ष घालून काम करावे. या योजनेतील पुणदी रस्त्यावरील टाकीत पाणी पडून त्याचे वितरण दि. ३0 नोव्हेंबरला झाले पाहिजे. सिध्देश्वर कॉलनी, बापूवाडी, महिला तंत्रनिकेतन या भागात पाण्याची तक्रार असल्याचेही आ. पाटील यांनी सांगितले. योजना पूर्ण झाली नाही, तर कार्यालयांना कुलपे घालू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच पाणी योजनांच्या बाबतीत राजकारण करून जनतेला वेठीस धरल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा आमदार आर. आर. पाटील यांनी दिला.
यावेळी नगराध्यक्ष संजय पवार, नगरपालिकेचे नगरसेवक, आदी पदाधिकाऱ्यांबरोबरच, कार्यकारी अभियंता नागरगोजे, उपअभियंता ए. डी. चौगुले, मुख्याधिकारी अभिजित वायकोस उपस्थित होते. (वार्ताहर)
आता मी इथेच आहे
पाणी पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आर. आर. पाटील यांनी दूरध्वनीवरून चर्चाही केली. त्यांनी अधिकाऱ्यांना शहराच्या पाणी पुरवठा योजनेचे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीत आबा म्हणाले की, आता मी इथेच आहे. तेव्हा काम करावेच लागेल. अन्यथा वाईट दिवस येतील, असा सज्जड इशारा त्यांनी यावेळी बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला.