पंधरा कोटी मिळाल्यास सिंचन योजना सुरू

By Admin | Published: August 20, 2016 11:09 PM2016-08-20T23:09:22+5:302016-08-20T23:15:54+5:30

वीज बिलाचा प्रस्ताव : राज्य शासनाकडून मंजुरी मिळाल्याची पाटबंधारे अधिकाऱ्यांची माहिती

If you get Rs 15 crore, start irrigation scheme | पंधरा कोटी मिळाल्यास सिंचन योजना सुरू

पंधरा कोटी मिळाल्यास सिंचन योजना सुरू

googlenewsNext

सांगली : जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचे थकीत वीज बिल भरून दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी १५ कोटींच्या निधीची गरज आहे, असा प्रस्ताव सांगली पाटबंधारे मंडळाने शासनाकडे पाठविला आहे. त्याला शासनाने मंजुरी दिली असून, लवकरच योजना कार्यान्वित होणार आहे, असे अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत. प्रत्यक्षात योजना तात्काळ चालू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनीही अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.
सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे. या भागातील पाझर तलाव कोरडेच असल्यामुळे येथील आगामी हंगामही अडचणी आहे. दुसऱ्या बाजूला कृष्णा खोऱ्यात चांगला पाऊस झाल्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीपात्रातून मुबलक पाणी वाहून जात आहे. या पाण्यातून दुष्काळी भागातील तलाव भरून दिल्यास निश्चितच त्या भागातील टंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. तेथील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा आणि पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही सुटणार आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून जत तालुक्यातील तलाव भरण्यासाठी व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला परिसरातील कोरडा नदीमध्ये पाणी सोडून बंधारे व तलाव भरण्यासाठी १.८० टीएमसी पाण्याची गरज आहे. याशिवाय कवठेमहांकाळ पूर्व भागासाठी ०.१० टीएमसी आणि गव्हाण (ता. तासगाव) उपसा सिंचन योजनेसाठी ०.१० टीएमसी असे एकूण दोन टीएमसी पाणी आवश्यक आहे. म्हैसाळ योजनेचे वीज बिल २९ कोटी ८६ लाख रुपये थकीत असल्यामुळे वीज पुरवठा खंडीत आहे. सध्याचे आवर्तन पूर्ण करण्यासाठी सुमारे ६.५० कोटी वीज बिल अपेक्षित आहे. ताकारी योजनेतून खानापूर, तासगाव तालुक्यातील तलाव भरण्यासाठी एक टीएमसी पाणी आवश्यक आहे. ताकारी योजनेचा वीज पुरवठा चालू असून, सध्याचे आवर्तन पूर्ण करण्यासाठी सुमारे तीन कोटी वीज बिल अपेक्षित आहे.
टेंभू उपसा सिंचन योजनेचा कडेगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यांना लाभ होतो. या भागाला पाणी देण्यासाठी १.५० टीएमसी पाण्याची गरज आहे. टेंभू योजनेचे (विसापूर व पुणदी योजनांसह) १४.४० कोटींचे वीज बिल थकीत आहे. सध्या दुष्काळग्रस्त भागातील तलाव भरण्यासाठी तातडीने पाच कोटींचे वीज बिल भरणे गरजेचे आहे. या तीनही योजनांचे वीज बिल भरण्यासाठी १५ कोटींचा निधी खर्च केल्यास दुष्काळी भागाचा प्रश्न सुटणार आहे, असा प्रस्ताव सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले यांनी शासनाकडे पाठविला होता. (प्रतिनिधी)


टेंभू योजनेचे माहुलीतील पंप सुरू, भाग्यनगर तलावात पाणी
विटा : अन्य राज्यात वाहून जाणारे कृष्णा नदीतील पुराचे पाणी दुष्काळी खानापूर व आटपाडी तालुक्याला देण्यासाठी टेंभू योजना कार्यान्वित करण्यात आली असून, शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता टेंभू योजनेचे माहुली (ता. खानापूर) येथील पंप सुरू करण्यात आले. या पंपगृहातून भाग्यनगर तलावात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, दुष्काळी आटपाडी तालुक्यातही टेंभूचे पाणी सोडण्यात येणार आहे. दुष्काळी खानापूर व आटपाडी तालुक्याला वरदान ठरणारी टेंभू योजना वीज बिलाच्या प्रश्नामुळे बंद ठेवण्यात आली होती. खानापूरचे आ. अनिल बाबर यांनी कृष्णा नदीचे पुराचे पाणी अन्य राज्यात वाहून जात आहे. त्यामुळे टेंभू योजना सुरू करून दुष्काळी खानापूर व आटपाडी तालुक्यातील तलाव भरून घ्यावेत, अशी लक्षवेधी सूचना नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मांडली होती. त्यावेळी दुष्काळी भागातील तलाव भरून घेताना येणारे वीज बिल सरकारने भरावे, अशी सूचनाही केली होती. या पार्श्वभूमीवर पुराचे पाणी उचलून दुष्काळी खानापूर व आटपाडी तालुक्यातील तलाव भरण्यासाठी टेंभू योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी माहुली येथील पंपगृहातील पंप सुरू करून टेंभूचे पाणी भाग्यनगर तलावात सोडण्यात आले. आता हे पाणी आटपाडी तालुक्यातील सोडण्यात येणार असल्याने आटपाडीकरांनाही दिलासा मिळणार आहे.


जुजबी उत्तरे नकोत : योजना सुरू करा...
टेंभू, ताकारी व म्हैसाळ योजना चालू करून दुष्काळी भागाला पाणी देण्याच्या मागणीचा ठराव शनिवारी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच यासाठी लागणारा निधी राज्य शासनाने टंचाईतून देण्याची मागणी अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी केली. त्यानुसार जि. प. अध्यक्षा स्नेहल पाटील यांनी तसा ठराव करून शासनाकडे पाठविण्यात येईल, असे उत्तर दिले. यावर अ‍ॅड. मुळीक यांनी अधिकाऱ्यांनी जुजबी उत्तरे देऊ नयेत. शासनाने सिंचन योजना चालू करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.

Web Title: If you get Rs 15 crore, start irrigation scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.