‘डॉल्बी’ लावलात, तर गुन्हे दाखल करणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:00 AM2017-08-21T00:00:40+5:302017-08-21T00:00:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली/मिरज : गणरायाचे आगमन व विसर्जन मिरवणुकीत कोणीही ‘डॉल्बी’ लावण्याचा प्रयत्न करू नये; अन्यथा मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी रविवारी दिला. ध्वनिप्रदूषणमुक्त उत्सव साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सांगली उपविभागीय क्षेत्रातील गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक रविवारी पोलिस मुख्यालयातील कृष्णा मॅरेज हॉलमध्ये पार पडली. त्यावेळी शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपायुक्त सुनील पवार, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे, उपअधीक्षक धीरज पाटील, मिरजेचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, निरीक्षक रवींद्र शेळके, रवींद डोंगरे, राजेंद्र मोरे, अशोक कदम, अनिल गुजर, रमेश भिंगारदेवे, अतुल निकम आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, गतवर्षी गणेशोत्सवात ‘नो डॉल्बी’ची मोहीम यशस्वी झाली. गणेश मंडळांनी ‘डॉल्बी’ न लावता त्यामधून बचत झालेले पैसे जलयुक्त शिवारासाठी दिल्याने जिल्ह्यात दोन सिमेंट बंधारे बांधण्यात आले. यंदाही बंधारे बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी मंडळांनी मदत करावी. ‘डॉल्बी’मुक्त उत्सव साजरा करण्यावर भर द्यावा. गणेशोत्सव मंडपात सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलिस व कार्यकर्ते यांच्यात समन्वय असावा. जिल्हाधिकारी काळम-पाटील म्हणाले, कायद्याचे पालन करुन उत्सव साजरा करावा. ‘इको फ्रेंडली’ उत्सवावर भर द्यावा. आयुक्त खेबूडकर म्हणाले, वाहतुकीला अडथळा होईल, असे मंडप उभारू नयेत. पालिकेने नदीवर विसर्जनासाठी कुंडाची सोय केली आहे.
सायंकाळी मिरजेत झालेल्या बैठकीत गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्रभर पारंपरिक वाद्ये वाजविण्याच्या मागणीबाबत जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी, कायद्याच्या कक्षेत राहून मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळण्यात येतील, असे सांगितले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरजेत आयोजित शांतता समितीच्या बैठकीत वाद्ये वाजविण्यासाठी कायद्याच्या उल्लंघनाचा आग्रह कोणीही करू नका, असे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनीही बजावले.
मिरजेतील विसर्जन मिरवणुकीत रात्री बारानंतर पारंपरिक वाद्ये वाजविण्यास परवानगी देण्याची गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. गणेश मंडळांनी यावर्षी सर्वपक्षीय समितीची स्थापना करून खा. संजय पाटील, आ. सुरेश खाडे, आ. जयंत पाटील यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना साकडे घातले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बैठक घेऊन, मिरजेत विसर्जन मिरवणुकीत शहराबाहेर पारंपरिक वाद्ये वाजविण्यास व रात्रभर देखावे, खाद्यपदार्थ स्टॉल सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचे निर्देश प्रशासनास दिले. या पार्श्वभूमीवर रविवारी पोलिस व प्रशासनातर्फे आयोजित बैठकीत पारंपरिक वाद्यांबाबत निर्णयाची प्रतीक्षा होती. आ. सुरेश खाडे यांनी, शहराबाहेर मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाप्रमाणे पारंपरिक वाद्ये वाजविण्याची व रात्रभर देखावे सुरू ठेवण्याची मागणी केली. याबाबत जिल्हाधिकारी काळम-पाटील म्हणाले, कायद्याच्या कक्षेत राहून मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करू. प्रशासनास कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रशासन गणेश मंडळांना सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी, वाद्ये वाजविण्यासाठी कायद्याच्या उल्लंघनाचा आग्रह धरु नका, असे बजावले. गणेशोत्सवात चार दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी आहे. हे चार दिवस रात्री बारापर्यंत देखावे व खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरु ठेवता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. एक बॉक्स व एक स्पिकरबाबतही ध्वनिमर्यादेचे पालन करण्याची सूचना केली.
बैठकीस आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपायुक्त स्मृती पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार शरद पाटील, पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील, पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार, मोहन जाधव, राजेंद्र चव्हाण यांच्यासह माजी आमदार हाफिज धत्तुरे, माजी महापौर विजय धुळूबुळू, सुरेश आवटी, निरंजन आवटी, अभिजित हारगे, ओंकार शुक्ल आदी उपस्थित होते.
करिअरला मुकू नका
पोलिसप्रमुख शिंदे म्हणाले, ‘डॉल्बी’ लावण्याचा कोणी प्रयत्न केला, तर मंडळांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील. मंडळाचे कार्यकर्ते तरुण आहेत. एकदा गुन्हा दाखल झाला की, पुढे शासकीय नोकरी मिळणे कठीण होईल. पासपोर्टही मिळणार नाही. त्यामुळे क्षणिक आनंदासाठी ‘डॉल्बी’ लाऊन करिअरला मुकू नका.