फरारी पोलिस अधिकारी दिसले तर पकडा!
By admin | Published: July 28, 2016 11:59 PM2016-07-28T23:59:02+5:302016-07-29T00:31:27+5:30
संशयितांची आत्महत्या : ‘सीआयडी’चे सांगली, सोलापूर पोलिसांना पत्र; छापासत्र सुरूच
सांगली : खुनाच्या गुन्ह्यातील संशयिताने पोलिस ठाण्यात आत्महत्या केल्याप्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभारलेल्या उमदी पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह तिघे कुठे दिसले, तर त्यांना पकडा, अशी सूचना सांगलीच्या राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना लेखी पत्र देऊन केली आहे. जिल्हा न्यायालयाने तिघांचा जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ३ आॅगस्टला त्यांच्या जामिनावर निर्णय होणार असल्याने, तत्पूर्वी त्यांना अटक करण्यासाठी सीआयडीने हालचाली सुरु ठेवल्या आहेत.
उमदीत दोन महिन्यापूर्वी एका महिलेचा खून झाला होता. या खूनप्रकरणी धुमकनाळ (ता. इंडी, जि. विजापूर) येथील चंद्रशेखर नंदगोंड या संशयितास ताब्यात घेतले होते. गुन्हा कबूल करण्यासाठी त्याला तीन दिवस डांबून ठेवून बेदम मारहाण केली होती. त्याने ठाण्यातील शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे, उपनिरीक्षक राजाराम चिंचोळीकर व हवालदार प्रमोद रोडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेची कारवाई टाळण्यासाठी तिघांनी पंधरवड्यापूर्वी सांगली जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण न्यायालयाने तिघांचाही जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे या पोलिस अधिकाऱ्यांना धक्का बसला. त्यांनी उच्च न्यायालयातून जामीन मिळविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. त्यानुसार त्यांनी गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने यावर येत्या ३ आॅगस्ट रोजी निर्णय ठेवला आहे.
वाघमोडे व चिंचोळीकर सोलापूर जिल्ह्यातील आहेत. रोडे मल्लेवाडी (ता. मिरज) येथील आहे. सीआयडीने या तिघांच्या शोधासाठी कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील सीआयडीची मदत घेतली होती. पण तरीही त्यांना तिघांचा सुगावा काढण्यात यश आलेले नाही. दोन अधिकारी आजारी रजेवर, तर रोडे हा गैरहजर असल्याची माहिती मिळाली आहे. तिघांचे सांगली किंवा सोलापूर जिल्ह्यात वास्तव्य असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीआयडीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना लेखी पत्र देऊन, हे तिघे कुठे दिसले तर पकडा, अशी सूचना केली आहे. याशिवाय ३ आॅगस्टला जामिनावर सुनावणी होणार असल्याने सीआयडीचे एक पथक रवाना केले जाणार आहे. सरकार पक्षातर्फे भक्कम बाजू मांडण्याची तयारी करण्यात आली असल्याचे चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
यंत्रमागासह खासगी सूतगिरण्यांना सवलती देऊ
सुभाष देशमुख : वस्त्रोद्योग प्रतिनिधींच्या बैठकीत आश्वासन
विटा : सहकारी व खासगी सूतगिरण्या आणि यंत्रमाग असा वस्त्रोद्योगात भेदभाव केला जाणार नाही. राज्य सरकार सहकारी क्षेत्रातील सूतगिरण्यांना ज्या सुविधा व सवलती मिळतील, त्या सर्व सवलती यंत्रमागासह खासगी सूतगिरण्यांनाही शासन देणार आहे, असे आश्वासन महाराष्ट्राचे वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी मुंबई येथे शिष्टमंडळाशी बोलताना दिले. यावेळी त्यांनी, खासगी सूतगिरण्यांनी त्यांच्या प्रकल्पावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प सुरू केल्यास त्या प्रकल्पाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.
मुंबई येथे वस्त्रोद्योगमंत्री देशमुख यांच्या दालनात राज्यातील खासगी सूतगिरणी यंत्रमाग प्रतिनिधींची बैठक झाली. त्यावेळी मंत्री देशमुख यांनी प्रतिनिधींना हे आश्वासन दिले. या बैठकीस विटा येथील विराज स्पिनर्स व यंत्रमाग संघाच्यावतीने किरण तारळेकर, विठ्ठल कार्पोरेशनचे अध्यक्ष संजय शिंदे, संजय जमदाडे उपस्थित होते.
बैठकीत खासगी सूतगिरणी प्रतिनिधींनी, सहकारी सूतगिरण्यांना राज्य सरकार मोठ्या प्रमाणात मदत करत असताना, यंत्रमाग व खासगी सूतगिरण्यांना शासन दुजाभाव करीत असल्याची खंत यंत्रमाग संघाच्या पदाधिकाऱ्यांनी वस्त्रोद्योगमंत्री देशमुख यांच्याकडे व्यक्त केली. यावेळी सहकारी सूतगिरण्यांप्रमाणेच प्रति चात्यास ३ हजार रूपये खासगी सूतगिरण्यांनाही बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे व अतिरिक्त असलेले विजेचे दर कमी करून इतर राज्यांच्या तुलनेत वीज दर असले पाहिजेत, अशी मागणी खासगी सूतगिरणीच्या प्रतिनिधींनी केली. राज्यात विजेचे दर महाग असल्याने यंत्रमाग व सूतगिरणी उद्योग चालविणे आणि स्पर्धेत टिकाव धरणे अवघड झाल्याचेही निदर्शनास आणून दिले.
यावेळी मंत्री देशमुख यांनी, सहकारी व खासगी असा भेदभाव केला जाणार नाही, ज्या खासगी सूतगिरण्या त्यांच्या प्रकल्पावर सौरऊर्जा प्रकल्प उभा करतील, अशा खासगी सूतगिरण्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.
या बैठकीस नागरिका एक्स्पोर्टचे सुनील पटवारी, विवेक गर्ग, टेक्नोक्रॉप्ट इंडस्ट्रीजचे आशिष सराफ, फॅबटेकचे भाऊसाहेब रूपनर, दिनेश रूपनर, जालनाचे संजय राठी, राजू पटोडिया, आर. एम. मोहिते इंडस्ट्रीजचे अभय भिडे, विज्ञान मुंढे, विलास सूर्यवंशी, के. शंकरमणी, अनिल सावंत, किरण मेहता, पी. कृष्णन् यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते. (वार्ताहर)