विश्वगुरू व्हायचे असेल तर स्वत:ला बदलावे लागेल - नितीन गडकरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 11:56 AM2024-10-05T11:56:01+5:302024-10-05T11:57:00+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

If you want to become Vishwaguru you have to change yourself says Union Minister Nitin Gadkari  | विश्वगुरू व्हायचे असेल तर स्वत:ला बदलावे लागेल - नितीन गडकरी 

विश्वगुरू व्हायचे असेल तर स्वत:ला बदलावे लागेल - नितीन गडकरी 

सांगली : आत्मनिर्भर भारत, फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी, थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी, विश्वगुरु हे सर्व म्हणायला सोपे आहे, पण त्यासाठी आपल्याला बदलायला हवे. दुसऱ्याला सांगण्यापेक्षा बदल स्वत:मध्ये करायला हवेत. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अंगीकार करावा लागेल, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

मराठा समाज संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी सांगलीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व सभागृह नुतनीकरण कामाचे उद्घाटन गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले. स्मरणिका प्रकाशनही पार पडले. गडकरी म्हणाले की, सत्ता, संपत्ती अन् सुख पायाशी लोळण घालत असतानाही उपभोगशून्य असलेल्या शिवाजी महाराजांनी रयतेच्या उद्धारासाठी व विकासाकरीता सेवा केली. त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला तर आपला समाज व देश आता आहे त्यापेक्षा अनेक पटीने पुढे जाईल.

ते म्हणाले, कोणताही व्यक्ती हा जात, धर्म, लिंग यानुसार छोटा किंवा मोठा होत नाही. त्याच्यातील गुणांनी तो मोठा होत असतो. शिवाजी महाराज म्हणजे गुणांचा भांडार होते. सर्वांना बरोबर घेऊन कसे राज्य करायचे, याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. त्यांच्या विचारांचा वारसा सर्वांनी जपला पाहिजे.

मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी स्वागत, तर निमंत्रक माजी खासदार संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार विश्वजीत कदम, माजी आमदार विलासराव जगताप, सदाशिवराव पाटील, दिनकर पाटील, नितीन शिंदे, शिवाजीराव नाईक, रासपचे नेते महादेव जानकर, माजी खासदार राजू शेट्टी, पृथ्वीराज पवार, जनसुराज्य पक्षाचे समीत कदम आदी उपस्थित होते.

जात, पैसा, गुन्हेगारीवर राजकारण

सध्या जात, पैसा, गुन्हेगारी हे राजकारणाचे अंगीभूत घटक बनले आहेत. या गोष्टी समाजासाठी चांगल्या नाहीत, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.

अभिमानाने छाती फुगते

देशाच्या कानाकोपऱ्यात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यानंतर लोक नतमस्तक होताना दिसतात, तेव्हा मराठी माणूस म्हणून आपली छाती अभिमानाने फुगते, असे मत राष्ट्रवादी पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

छत्रपतींच्या आडनावाने राज्याची ओळख नाही

शरद पवार म्हणाले की, देशात पूर्वी मोघलांचे, आदिलशाहीचे, देवगिरीच्या यादवांचे राज्य अशी वेगवेगळ्या राज्यांची ओळख होती. मात्र, या देशात छत्रपती शिवाजी महाराज असा एकच राजा होऊन गेला ज्याच्या आडनावाने कधी राज्य ओळखले जात नाही. भोसलेंचे राज्य म्हणून ओळख न होता शिवछत्रपतींचे राज्य हे रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखले जाते.

मराठा समाजाची परंपरा कौतुकास्पद

मराठा केवळ एक जात नाही. सर्व जाती-धर्मांचा आदर करुन त्यांना सोबत घेऊन जाण्याचा विचार आहे. सांगलीत मराठा समाज संस्थेने तो विचार अनेक सामाजिक उपक्रमातून जपला आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

पवार गेले, गडकरी आले

शरद पवार व नितीन गडकरी आज एकाच व्यासपीठावर येणार म्हणून उपस्थितांत उत्सुकता होती. मात्र, कार्यक्रमांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे शरद पवार नियोजित वेळेपेक्षा लवकर आले. भाषण करुन ते निघून गेल्यानंतर गडकरींचे कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झाले. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही.

सांगलीच्या दुष्काळी भागातून नवा महामार्ग

मुंबईच्या अटल सेतूपासून पुणे व पुण्यातून बेंगलोरपर्यंत नवा राष्ट्रीय महामार्ग साकारला जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातून तो जाणार असल्याने येथील विकासला चालना मिळेल, असे गडकरी म्हणाले.

गडकरींना व्यक्तीचित्र 

नवकृष्णा व्हॅली महाविद्यालयाचे प्रा. सुमेध कुलकर्णी यांनी शुक्रवारी गडकरी यांना त्यांचे व्यक्तिचित्र भेट दिले. व्यक्तिचित्रासाठी कुलकर्णी यांना सत्यजित वरेकर, होळकर, पूजा सकटे यांचे मार्गदर्शन लाभले

Web Title: If you want to become Vishwaguru you have to change yourself says Union Minister Nitin Gadkari 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.