इस्लामपूरला लाभलेला ‘स्वच्छतादूत’ दुर्लक्षित : अभियानापुरतीच जागृती झाल्याचे चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 11:58 PM2018-07-02T23:58:42+5:302018-07-02T23:59:01+5:30
स्वच्छ भारत अभियानात इस्लामपूर पालिकेने महाराष्ट्रात आठवा क्रमांक मिळवला. याचा आनंदोत्सव साजरा होऊन आठवडाही लोटला नाही, तोवरच शहरात पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत
अशोक पाटील ।
इस्लामपूर : स्वच्छ भारत अभियानात इस्लामपूर पालिकेने महाराष्ट्रात आठवा क्रमांक मिळवला. याचा आनंदोत्सव साजरा होऊन आठवडाही लोटला नाही, तोवरच शहरात पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत. याकडे पालिकेचे दुर्लक्ष आहे. दुसरीकडे कोणत्याही अपेक्षेशिवाय इस्लामपूर शहाराची स्वच्छता करणारा ‘स्वच्छतादूत’ मात्र सर्वांकडूनच दुर्लक्षित राहिला आहे.
केवळ अभियानाची घोषणा झाल्यावरच स्वच्छतेबाबत जागरुकता दाखविणाºया इस्लामपूर पालिकेने स्वच्छ भारत अभियानात हिरीरीने भाग घेतला. शहरातील सर्वच घटकांनी मदत केली. यामुळे पालिकेला राज्यात आठवा क्रमांक मिळाला. परंतु अभियान संपले आणि पुन्हा शहरात कचराकुंड्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. शहरातील मारुती मंदिर व गणेश मंदिरालगत कचºयाची दुर्गंधी आहे. रविवारी संकष्टीदिवशी या दुर्गंधीतूनच भाविकांना दर्शनासाठी यावे लागत होते. स्वच्छतेचा ठेका बगलबच्चांना देण्यात आला आहे. त्यामुळेच स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत.
एकीकडे पालिकेच्या स्वच्छता विभागाची अशी परिस्थिती असताना, दुसरीकडे मात्र परराज्यातून शहरात आलेला एक अनामिक मात्र दररोज सकाळी ६ ते ८ या दोन तासात कोणत्याही अपेक्षेशिवाय झरी नाका ते गांधी चौकातील सर्व रस्ते स्वच्छ करतो. तो कन्नडमध्ये बोलतो. मात्र आपले नाव तो ‘महात्मा गांधींचा वारस’ असे सांगतो.
हातात खराटा आणि स्वच्छता, एवढाच त्याचा नित्यक्रम. कपडे मळकटलेले आहेत. जो शहराची स्वच्छता करण्यासाठी आघाडीवर आहे. तो सगळ्यांकडून दुर्लक्षित राहिला आहे. सामाजिक संघटनांनी त्याचे पुनर्वसन करावे, अशी मागणी होत आहे.
स्वच्छतागृह कुलूपबंद
स्वच्छ भारत अभियानाच्या काळात इस्लामपूर पालिकेने वाळवा बझारसमोर तातडीने दोन दिवसात उभे केलेले महिलांसाठीचे स्वच्छतागृह आता कुलूपबंद आहे. याचा वापर इतर कारणांसाठीच होत असल्याचेही निदर्शनास येत आहे.