नाट्य स्पर्धेचा दुर्लक्षित इतिहास उजेडात आणायला हवा ! राज्य नाट्य स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 11:33 PM2018-11-15T23:33:55+5:302018-11-15T23:36:54+5:30

अभिराम भडकमकर, आशुतोष पोतदार ही कोल्हापुरात घडलेल्या आणि बाहेर पोहोचलेल्या, यशस्वी ठरलेल्या नाटककारांची आणखी काही नावे. खरं तर आणखीही खूप नावे आहेत; पण त्यांना मिळालेले यश एका मर्यादेत राहिले.

The ignorance of the theater competition should be highlighted! State theatrical competitions | नाट्य स्पर्धेचा दुर्लक्षित इतिहास उजेडात आणायला हवा ! राज्य नाट्य स्पर्धा

नाट्य स्पर्धेचा दुर्लक्षित इतिहास उजेडात आणायला हवा ! राज्य नाट्य स्पर्धा

googlenewsNext
ठळक मुद्देइतिहास असे सांगतो की, १८५१ च्या सुमारास विष्णुदास भावे यांनी परगावात जाऊन नाटकांचे प्रयोग करणे सुरू केले. राज्य नाट्य स्पर्धेतील अशा यश संपादनाला सुरुवात झाली ती ‘पूल’ नावाच्या नाटकापासून.

- उदय कुलकर्णी -

अभिराम भडकमकर, आशुतोष पोतदार ही कोल्हापुरात घडलेल्या आणि बाहेर पोहोचलेल्या, यशस्वी ठरलेल्या नाटककारांची आणखी काही नावे. खरं तर आणखीही खूप नावे आहेत; पण त्यांना मिळालेले यश एका मर्यादेत राहिले. राज्य नाट्य स्पर्धेत कोल्हापुरात यशस्वी ठरली आणि नंतर राज्यात नावलौकिकास पात्र ठरली अशीही अनेक नाटके सांगता येतील. दोन ठळक उदाहरणंच द्यायची तर ‘किंग लिअर’, ‘आर्य चाणक्य’ ही नावे सांगता येतील. राज्य नाट्य स्पर्धेतील अशा यश संपादनाला सुरुवात झाली ती ‘पूल’ नावाच्या नाटकापासून.

इतिहास असे सांगतो की, १८५१ च्या सुमारास विष्णुदास भावे यांनी परगावात जाऊन नाटकांचे प्रयोग करणे सुरू केले. त्यांनी प्रथम कोल्हापुरात आणि नंतर पुण्यात आपली नाटक मंडळी नेली. थोडक्यात सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर परिसरात मराठी रंगभूमीची मूळं आधी रुजली आणि त्यानंतर आठ-नऊ वर्षांनी पुणे, मुंबई ही शहरे मराठी रंगभूमीशी निगडित झाली.

महादेवशास्त्री कोल्हटकर यांनी १८५७ मध्ये ‘आॅथेल्लो’, विनायक कीर्तने यांनी १८६१ मध्ये ‘थोरले माधवराव’, आनंद सखाराम बर्वे व सखाराम परशुराम पंडित यांनी अनुक्रमे ‘हिम्मत बहाद्दूर’ व ‘शेराला सव्वाशेर’ ही नाटके १८६७ मध्ये लिहिली. ‘आॅथेल्लो’ हे नाटक आधी लिहिले गेले असले तरी पहिले स्वतंत्र मराठी नाटक म्हणून विनायक कीर्तने यांच्या ‘थोरले माधवराव’ या नाटकाला नाट्यरसिकांनी विशेष मान द्यायला हवा, असे बडोदा येथील अभ्यासक गणेश दंडवते यांचे मत होते.

कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब अशी की, ‘थोरले माधवराव’ या नाटकाचे त्या काळात जे प्रयोग झाले ते सर्व ‘इचलकरंजीकर नाटक मंडळीं’नी सादर केले होते. विष्णुदास भावेंच्याच काळात पुढे आलेली कोल्हापूरकर नाटक मंडळी, नंतर अनेक पौराणिक नाटके गाजविणारी ‘शाहूनगरवासी नाटक मंडळी’ तसेच ‘इचलकरंजीकर नाटक मंडळी’ या नाटक मंडळींची प्रेरणास्थाने, त्यातील कलाकार, त्यांनी सादर केलेले कलाप्रयोग हा सगळा इतिहास नीटपणे शोधून नव्या पिढीसमोर मांडण्याची आवश्यकता आहे. मी शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा शाहूनगरवासी नाटक मंडळींनी प्रा. वा. बा. केळकर लिखित ‘त्राटिका’ नावाचा नाट्यप्रयोग सादर केल्याची आठवण लिहून ठेवलेली मिळाली. बळवंतराव जोग, गणपतराव जोशी, गोविंंदराव सुपेकर, अशी शाहूनगरवासी नाटक मंडळीतील काही कलाकारांची नावेही हाती लागली; पण त्यापेक्षा अधिक संदर्भ माझ्या हाती लागले नाहीत.

कोल्हापुरातील दिवंगत रसिक प्रकाश फार्मसीचे प्रकाश पुरोहित यांच्या संग्रहातील काही कात्रणे पाहायला मिळाली. या कात्रणातून एक गोष्ट स्पष्ट झाली की, ‘कोल्हापूरकर नाटक मंडळी’ या नावाने जी नाटक कंपनी ओळखली जात होती तिलाच ‘चित्तचक्षुचमत्कारिक’ असे विशेषण जोडण्यात येत असे. कै. नारायणराव कारखानीस यांनी कोल्हापुरात पहिल्यांदा नाटक कंपनी काढली. महालक्ष्मी मंदिरातील गरूड मंडप व मान्यवरांच्या वाड्यामध्ये या नाटक मंडळींचे आख्यानवजा पौराणिक खेळ होत असत. १८४० मध्ये जन्मलेले नरहर गोपाळ सरडे कारखानीसांच्या नाटक मंडळीत सहभागी होते. सरडे १८६१ मध्ये त्या नाटक मंडळीतून बाहेर पडले आणि त्यांनी ‘चित्तचक्षुचमत्कारिक’ नावाची नाटक कंपनी स्थापन केली.

नरहरबुवांनी जशी गद्य नाटके रंगमंचावर आणली तशी संगीत नाटकेही रंगमंचावर आणली. नरहरबुवांनीच १८७१ मध्ये ‘स्वरसकेशा’ नावाचे सामाजिक नाटक रंगभूमीवर आणल्याची नोंद मिळते. ‘पारिजात’, ‘द्रौपदी वस्रहरण’, ‘शुक-रंभासंवाद’, ‘संगीत संभाजी’, ‘राधाविलास’ ही नाटकेही रंगभूमीवर आणणाऱ्या नरहरबुवांचे १८९८ साली निधन झाले; पण तत्पूर्वी अण्णासाहेब किर्लोस्करांनी लिहिलेले ‘शांकर दिग्विजय’ नावाचे नाटकही नरहरबुवांनी रंगमंचावर आणले म्हणजे नाटककार अण्णासाहेब किर्लोस्करांना रंगभूमीशी जोडण्याचा पहिला मान नरहरबुवांकडे जातो. या दुर्लक्षित इतिहासाकडे कोण आणि कधी पाहणार?


राज्य हौशी नाट्य स्पर्धा ही खरे तर रंगभूमीवर नवनवे प्रयोग करू पाहणाºया तरुणाईसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली संधी. या संधीचा लाभ घेऊन काळाच्या ओघात अनेक नाटककार आणि कलाकार पुढे आले. कोल्हापुरातीलही अशी अनेक नावे सांगता येतील. अर्थात त्यामध्ये नव्या नाटककारांची संख्या कमी आहे; पण कोल्हापुरातून जे नवे नाटककार पुढे आले त्यांची नाटके महाराष्ट्रातील अन्य ठिकाणच्या किंवा व्यावसायिक नाट्य संस्थांनाही सादर करावीशी वाटली हे महत्त्वाचे. अशा नाटककारांपैकी हिमांशु स्मार्त आणि विद्यासागर अध्यापक यांच्या संहिता यावर्षीही स्पर्धेमध्ये सादर होत आहेत.

आजचे नाटक--- सिगारेट्स --   संस्था : भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)


 


 

Web Title: The ignorance of the theater competition should be highlighted! State theatrical competitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.