स्वच्छतेकडे दुर्लक्ष; मुकादम निलंबित
By admin | Published: January 5, 2015 11:51 PM2015-01-05T23:51:44+5:302015-01-06T00:45:37+5:30
महापालिकेची कारवाई : मिरजेतील सहा अधिकाऱ्यांचे वेतन रोखले
मिरज : मिरजेत स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणाबद्दल आज (सोमवारी) आरोग्य अधिकाऱ्यांसह स्वच्छता निरीक्षकांचे वेतन थांबवून एका मुकादमाचे निलंबन करण्यात आले. शहरातील गॅस्ट्रो साथीच्या पार्श्वभूमीवर उपायुक्त प्रशांत रसाळ यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
मिरजेत नोव्हेंबर महिन्यात गॅस्ट्रोच्या साथीने अनेकांचे बळी गेल्यानंतर आरोग्य विभागाची झाडाझडती सुरू आहे. उपायुक्तांनी शहरातील दैनंदिन स्वच्छतेबाबत आरोग्य विभागाला दिलेल्या सूचनांचे पालन केलेले नाही. चार महिने कामावर गैरहजर असलेल्या प्रभाग चारमधील मुकादम सुनील प्रल्हाद आटवाल याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, स्वच्छता निरीक्षक किशोर गोंधळेकर, स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, एस. आर. पै, बी. आर. दशवंत, बाळासाहेब शिसाळे, रवींद्र दामटे यांचे वेतन रोखले आहे. स्वच्छता निरीक्षकांनी दररोज पहाटे हजेरी शेडवर उपस्थित रहावे, नगरसेवकांच्या तक्रारींची लेखी नोंद करावी, कचऱ्याची सर्व वाहने दररोज सकाळी बाहेर पडली पाहिजेत, असे फर्मान काढण्यात आले आहे. मात्र या आदेशाचे पालन करण्यात आले नाही. हजेरी शेडवर विद्युत दिवे नसल्याचे, कंटेनरमध्ये कचरा भरून वहात असल्याचे दिसून आले. आरोग्य विभागाचा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कारभारात सुधारणा झाली नाही, तर एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचेही उपायुक्त रसाळ यांनी सांगितले. (वार्ताहर)
जीपीएस बसविणार
आरोग्य विभागाच्या कचरा गोळा करणाऱ्या वाहनांचा वापर न करता डिझेलचा अपहार करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या सर्व वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. चांगले काम करणाऱ्या गुणवंत स्वच्छता निरीक्षक, मुकादम व सफाई कर्मचाऱ्यास स्वच्छतादूत पुरस्कार देण्यात येणार आहे.