डॉक्टरांच्या निवासस्थानाकडे दुर्लक्ष
By admin | Published: December 15, 2014 10:49 PM2014-12-15T22:49:14+5:302014-12-16T00:12:08+5:30
कडेगाव ग्रामीण रूग्णालय : रूग्णांची संख्या जास्त असताना मूलभूत सुविधांची वानवा
शाळगाव : कडेगाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांना निवासस्थान नसल्याने डॉक्टरांबरोबर रुग्णांचीही गैरसोय होत आहे. कडेगाव येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय बांधण्यात आले आहे. परंतु हे रुग्णालय बांधत असताना डॉक्टरांची किंवा कर्मचारी वर्गासाठी राहण्याच्यादृष्टीने त्यांना क्वार्टर बांधण्यात आलेले नाहीत. त्यामुळे डॉक्टर, कर्मचाऱ्यांबरोबर रुग्णांचीही गैरसोय होत आहे.
कडेगाव ग्रामीण रुग्णालयात एकूण १४ कर्मचारी काम करतात. त्यामध्ये तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पूर्वी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत होती. ती इमारत पाडून ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम करण्यात आले आहे. याकरिता एकूण सुमारे २ एकर ८८ आर जागा दवाखान्यासाठी घेण्यात आली आहे. याठिकाणी एकूण तीन वॉर्ड आहेत. ग्रामीण रुग्णालय बांधत असताना जागा असूनदेखील कर्मचारी वर्गासाठी स्वतंत्र क्वार्टर बांधण्यात आले नाही. त्यामुळे डॉक्टरांसह कर्मचारी वर्ग तीन शिफ्टमध्ये दवाखान्यात काम करतात. दवाखान्यात अत्याधुनिक पध्दतीच्या रुग्णवाहिका आहेत. सध्या दवाखान्यात सुमारे ३० गुंठे मोकळी जागा आहे. या ठिकाणी कर्मचारी क्वार्टर बांधावे, असे कर्मचाऱ्यांची मागणी आहे. कर्मचारी वर्गासाठी पोलीस खात्याची जागा खोल्या घेण्याचा निर्णय झाला होता. तशा प्रकारचा प्रस्ताव आरोग्य खात्याकडून देण्यात आला होता. त्यावेळी तो प्रस्ताव मंजूर झाला असल्याचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी जाहीर केले होते. परंतु त्याबाबत अंतिम निर्णय न झाल्याने प्रश्न प्रलंबित आहे. आरोग्याधिकारी एच. एम. मदने यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, सध्या राहण्याची गैरसोय आहे. त्यामुळे रात्री येणऱ्या रूग्णांची गैरसोय होत आहे. (वार्ताहर)