प्रतीक पाटील, शैलजाभाभींचा मेळाव्यावर बहिष्कार
By admin | Published: June 22, 2016 11:13 PM2016-06-22T23:13:59+5:302016-06-23T01:42:40+5:30
पलूसमधील प्रकार : कॉंग्रेस नेत्यांची नावे, छायाचित्रे फलकावर नसल्याने उमटला नाराजीचा सूर
पलूस : तालुक्यात बुधवारी झालेल्या कॉँग्रेसच्या मेळाव्यावर माजी केंद्रीयमंत्री प्रतीक पाटील आणि राज्य महिला कॉंग्रेसच्या सरचिटणीस शैलजाभाभी पाटील यांनी बहिष्कार टाकला. व्यासपीठावर लावलेल्या फलकावर राष्ट्रीय व राज्यस्तरावरील कोणत्याही पक्षीय वरिष्ठ नेत्याचे नाव नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्यासाठी सर्व तालुकास्तरावर जनसंपर्क मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. पलूसमधील नववा मेळावा बुधवारी सांगडेवाडी येथे झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मोहनराव कदम होते. यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील, पक्षनिरीक्षक माजी आमदार प्रकाश यलगुलवार, प्रकाश सातपुते, सत्यजित देशमुख, हाफिज धत्तुरे, महेंद्र लाड, मीनाक्षी सावंत उपस्थित होते.
प्रतीक पाटील, शैलजाभाभी मेळाव्यासाठी आले होते. व्यासपीठावर लावलेल्या बोर्डावर कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी अथवा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे कोणाचेच छायाचित्र किंवा नाव नसल्याचे लक्षात आल्यानंतर मेळावा पक्षाचा नसून कदम काँग्रेसचा आहे, असे दिसून येताच प्रतीक पाटील, शैलजाभाभी पाटील नाराज झाले. मेळाव्यास न थांबता ते आपल्या कामासाठी निघून गेले. मेळाव्यास जे. के. बापू जाधव यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते अनुपस्थित होते. याचीही चर्चा सभास्थळी सुरू होती.
मेळाव्यात पतंगराव कदम म्हणाले की, काँग्रेसची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व तालुकास्तरावर मेळावे आयोजित करणारा सांगली जिल्हा एकमेव आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व नगरपंचायती, नगरपालिका, जिल्हा परिषदेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसच्या चिन्हावरच लढवायच्या आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी गट, तट न पाहता जिद्दीने व आत्मविश्वासाने पक्षाचे काम करुन गड कायम राखावा. तालुकाध्यक्ष ए. डी. पाटील यांनी स्वागत, तर सतीश पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पृथ्वीराज चव्हाण, गिरीश गोंदिल, के. डी. कांबळे, सभापती विजय कांबळे, श्वेता बिरनाळे, मालन मोहिते, वैभव पुदाले, महादेव पाटील, आनंदराव मोहिते, पृथ्वीराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. (वार्ताहर)
चूक तालुका कॉँग्रेसची!
सभा संपल्यानंतर प्रतीक पाटील, शैलजाभाभी यांच्या बहिष्काराबाबत आ. पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हा प्रश्न तालुका काँग्रेसचा आहे. त्यांनी बोर्डावर त्यांचे छायाचित्र लावायला हवे होते. निदान नाव तरी छापायला पाहिजे होते. ही चूक तालुका काँग्रेसची आहे.