बेकायदा गर्भपातप्रकरण : कोल्हापुरातील संशयितांची नावे निष्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 02:16 PM2018-09-20T14:16:21+5:302018-09-20T14:20:20+5:30
सांगली येथील गणेशनगरमधील चौगुुले मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिकलमध्ये गर्भपाताची महिलांना पाठविणाऱ्या कोल्हापुरातील काही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची नावे निष्पन्न झाली आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी गुरुवारी दिली.
सांगली : येथील गणेशनगरमधील चौगुुले मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिकलमध्ये गर्भपाताची महिलांना पाठविणाऱ्या कोल्हापुरातील काही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची नावे निष्पन्न झाली आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी गुरुवारी दिली. गर्भपाताची किटस् देणाऱ्याचा सुगावा लागला आहे. लवकरच त्याला अटक केली जाईल. यापुढे असे प्रकार टाळण्यासाठी टास्क फोर्स पथक तयार करुन रुग्णालयांची नियमीत तपासणी केली जाईल, असेही शर्मा यांनी सांगितले.
ते म्हणाले, चौगुले हॉस्पिटलमध्ये उघडकीस आलेले गर्भपात प्रकरण अत्यंत गंभीर आहे. याच्या तपासाचा मी स्वत: दररोज आढावा घेत आहे. वैद्यकीय पथकाची मदत घेऊन तपास केला जात आहे. यामध्ये मोठे रॅकेट आहे. या हॉस्पिटलला गर्भपात करण्याचा परवाना नाही. तरीही याठिकाणी सांगली व कोल्हापूरातील काही डॉक्टर महिला रुग्णांना पाठवित होते. पोलिसांच्या छाप्यात गर्भपाताची पंधरा किटस् सापडली होती.
ही किटस्, औषधे व इंजक्शनचा साठा त्यांना कोण पुरवत होते? याबद्दल चौकशी केली जात आहे. काही जणांची नावे पुढे आली आहेत. डॉ. रुपाली चौगुले व तिचा पती डॉ. विजयकुमार चौगुले हे मुख्य संशयित आहेत. यामध्ये आणखी काही जणांना अटक होऊ शकते. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई केली जाईल. कुणाचीही गय केली जाणार नाही.
ते म्हणाले, गर्भपात केलेल्या सर्वच महिलांची चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. यातील कोल्हापुरातील एक महिला गर्भपात करण्यासाठी कोल्हापुरच्या रुग्णालयात गेली होती. पण तेथील डॉक्टरने गर्भपात करण्यास नकार दिला. ही बाब रुग्णालयातील कर्मचाऱ्याला समजली. त्याने या महिलेस गाठून सांगलीतील चौगुले हॉस्पिटलचा पत्ता देऊन तिथे जाण्याचा सल्ला दिला. यासाठी त्याने पैसेही घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
या कर्मचाऱ्यांस चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार आहे. यामध्ये मोठे रॅकेट आहे. मुळापर्यंत जाऊन तपास केला जाईल. संशयिताविरुद्ध भक्कम पुरावे गोळा केले जातील. तपासात दरम्यान आणखी भ्रूण हत्येची आणखी काही प्रकरणे उघडकीस आल्यास संशयितावर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल केले जातील. गर्भपात करण्यामागील मुख्य कारणाचाही शोध घेतला जात आहे. वंशाला मुलगाच हवा, ही समाजाची मानसिकता आणि विचार बदलले तरच अशा गुन्ह्यांना आळा बसणार आहे.
गणेशोत्सवानंतर पथक
शर्मा म्हणाले, म्हैसाळनंतर सांगलीत गर्भपाताचे प्रकरण उजेडात आले. या घटनांना आळा घालण्यासाठी गणेशोत्सव झाल्यानंतर महापालिका, महसूल व पोलीस विभागाची संयुक्तपणे बैठक घेतली जाईल. या बैठकीत टास्क फोर्स पथक तयार केले जाईल. पथकामार्फत विशेषत: मॅटर्निटी रुग्णालयांची नियमित तपासणी जाईल. नागरिकांनीही काही माहिती मिळाल्यास ती संबंधित विभागाला देण्यासाठी पुढे आले पाहिजे.