सांगलीत सात महिलांचा बेकायदेशीर गर्भपात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 12:20 AM2018-09-16T00:20:39+5:302018-09-16T00:21:04+5:30
आरोग्य पथकाचा खासगी हॉस्पिटलवर छापा
सांगली : येथील गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलने कर्नाटकातील सात महिलांचा बेकायदेशीरपणे गर्भपात केल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगली महापालिकेच्या आरोग्य विभाग व पोलीस यांच्या संयुक्त पथकाने शनिवारी छापा टाकून १५ गर्भपाताची कीटस् मुदतबाह्य औषधे, इंजेक्शनसह दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) भ्रूण हत्याकांडाने राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. रूपाली विजयकुमार चौगुले, डॉ. विजयकुमार चौगुले या दाम्पत्यासह व डॉ. स्वप्नील जगवीर जमदाडे यांच्याविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती. जमदाडे हे चौगुले दाम्पत्याचे नातेवाईक असून त्यांच्याच नावावर या रुग्णालयाच्या नर्सिंग होमचा परवाना आहे. रूपाली चौगुले या हे रुग्णालय चालवितात. कारवाई सुरू असताना त्या चक्कर येऊन कोसळल्या. वैद्यकीय गर्भपात प्रतिबंध कायद्यांतर्गत त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही.