पूरपटट्यात पुन्हा बेकायदेशीर बांधकामे
By admin | Published: June 21, 2016 12:15 AM2016-06-21T00:15:35+5:302016-06-21T01:19:27+5:30
सांगलीतील प्रकार : सोयीसाठी अनेकांनी वळविला नाला, भराव टाकून संकटाला निमंत्रण देण्याची तयारी
अविनाश कोळी --सांगली --महापुराच्या काळात मोठा फटका बसल्यानंतरही पूरपटट्यातील नियमांचे सर्रास उल्लंघन करून सांगलीत बेकायदेशीर बांधकामांना ऊत आला आहे. जुना बुधगाव रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून ब्ल्यू झोनमध्येच माती, दगडांचे भराव टाकून बांधकामे करण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासन आणि महापालिका या दोन्ही कार्यालयांची ही संयुक्त जबाबदारी असतानाही त्यांनी केलेले दुर्लक्ष बांधकाम करणाऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे.
सांगली शहरातील पूरपटट्यात सुमारे १५ हजार लोकवस्ती आहे. तत्कालीन नगरपालिकेच्या नकाशातून नाले गायब केल्यानंतर १९८० पासून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू झाली. २00५ आणि २00६ च्या महापुरानंतर नैसर्गिक नाले आणि पूरपटट्यातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न अधोरेखित झाला. त्यानंतर ४३.३ ही पूरपातळी गृहीत धरून ब्ल्यू झोन तयार घोषित करण्यात आला. ज्याठिकाणी ४० पूरपातळीलाच पाणी येते त्या जुना बुधगाव रस्त्यावरील ओतांमध्ये आता बेकायदेशीर बांधकामांची संख्या वाढत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून याठिकाणी गॅरेज व अन्य व्यवसायिकांनी भर टाकून ओत काबीज करण्यास सुरुवात केली आहे. जुना बुधगाव रस्त्याच्या पश्चिमेकडील ओत आता ५० टक्के अतिक्रमणांनी व्यापला आहे. यात आता गेल्या दोन दिवसांपासून आणखी काही बांधकामांची भर टाकण्याची तयारी सुरू झाली आहे.
नदीपातळी वाढली की कृष्णाकाठी धास्ती सुरू होते. निसर्गाची ही टांगती तलवार पूरपटट्यातील नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे.
केवळ नागरिकांपुरता हा विषय मर्यादित राहिला नाही. पूरस्थितीत शासनाच्या तिजोरीलाही फटका बसतो. मदत व पुनर्वसन विभागाने २००५ आणि २००६ या कालावधित कोट्यवधी रुपये पुनर्वसनावर खर्च केले.
वास्तविक नैसर्गिक नाले, ओत हे शासनाच्या मालकीचे आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचीही याबाबतची जबाबदारी मोठी आहे. महापालिकेनेही अतिक्रमणांवर किंवा बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे. मात्र दोन्ही कार्यालयांकडून या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले आहे. याच गोष्टीचा फायदा घेत अनेक व्यावसायिकांनी आपले बस्तान पूरपटट्यात बसविण्यास सुरुवात केली आहे. त्यांना कोणाचेही भय उरलेले नाही. ठराविक अतिक्रमणांमुळे संपूर्ण शहर भविष्यात वेठीस धरले जाईल, याची कल्पना ना बांधकाम करणाऱ्यांना आहे ना प्रशासनाला.
नाल्यावर अतिक्रमण : सोयीचे वळण
बेकायदेशीर बांधकामांच्या सोयीसाठी अनेकांनी नैसर्गिक नालाच वळविण्याचे धाडस केले आहे. कर्नाळ रस्त्यावरील पुलापासून मीरा हौसिंग सोसायटीपर्यंत नाल्याचा प्रवाह अनेकठिकाणी बदलण्यात आला आहे. जुना बुधगाव रस्त्यावर नव्याने सुरू असलेल्या बांधकामांसाठी पुन्हा नाला वळविण्यात आला आहे. काहीठिकाणी नाल्याला पाईपमध्ये बंदिस्त करून त्यावरून रस्ता तयार करण्यात आला आहे. ही परिस्थिती राहिली तर १६ नाल्यांपैकी उरलेला हा शेवटचा नालासुद्धा कधी गायब झाला, हे प्रशासनाला कळणारसुद्धा नाही.