सांगली, मिरजेत पुन्हा पेरले गॅस बॉम्ब; जिल्हा पुरवठा विभागाचे सोयीस्कर मौन

By अविनाश कोळी | Published: May 24, 2024 04:09 PM2024-05-24T16:09:14+5:302024-05-24T16:11:22+5:30

महापालिका क्षेत्रात सिलिंडर काळाबाजार जोमात

Illegal gas cylinder filling station at Sangli, Miraj | सांगली, मिरजेत पुन्हा पेरले गॅस बॉम्ब; जिल्हा पुरवठा विभागाचे सोयीस्कर मौन

सांगली, मिरजेत पुन्हा पेरले गॅस बॉम्ब; जिल्हा पुरवठा विभागाचे सोयीस्कर मौन

अविनाश कोळी

सांगली : पोलिस, जिल्हा पुरवठा विभागाचे अभय मिळत असल्याने सांगली, मिरजेत पुन्हा बेकायदेशीर रिफिलिंग सेंटर्सच्या माध्यमातून गॅसच्या बॉम्बची पेरणी केली जात आहे. दुसरीकडे ग्राहकांसाठी आलेल्या सिलिंडरचा पुरवठा या माफियांना कसा होत आहे, असा सवालही प्रशासनाला पडत नाही. त्यामुळे भविष्यात मोठ्या दुर्घटनेच्या शक्यतेचे ढग यामुळे दाटले आहेत.  
मिरजेत सहा महिन्यांपूर्वी बेकायदेशीर गॅस सिलिंडर भरणा केंद्रात स्फोट झाला. दीड वर्षापूर्वीही मिरजेत अशी दुर्घटना घडली होती. वारंवार स्फोटाच्या घटना घडत असताना बेकायदेशीर रिफिलिंग सेंटर्स कसे काय उभारले जात आहेत, असा सवाल उपस्थित हाेत आहे. धोकादायक सेंटर्सच्या माध्यमातून लोकांच्या जिवाशी खेळ खेळण्याचा प्रकार सुरू आहे. भरवस्त्यांमध्ये हे बॉम्ब पेरले गेले आहेत. छापे टाकून पोलिसांनी कारवाई केल्यानंतर काही काळ हे व्यावसाय शांत होतात, मात्र पुन्हा डोकी वर काढून आगीशी खेळ चालू होतो. सिलिंडरचा काळाबाजारही यातून जोमात आहे. 

महिन्याकाठी ५० ते ५५ लाखांची उलाढाल

दोन्ही शहरांतील अड्ड्यांच्या संख्येचा विचार केल्यास महिन्याकाठी ५० ते ५५ लाखाची उलाढाल होते. अवघ्या ५० हजार रुपयांच्या गुंतवणुकीत हा बेकायदेशीर व्यवसाय दरमहा लाखो रुपये मिळवून देतो.

व्यवसायाचे गणित असे आहे

घरगुती गॅस सिलिंडरचा दर सध्या ८०६ रुपये आहे. काळ्या बाजारात अशा अड्डेचालकांना तो १२०० रुपयांनी पुरविला जातो. प्रतिकिलो ९० रुपयांप्रमाणे वाहनांमध्ये गॅस भरला जातो. १४.२ किलोचा सिलिंडर असल्याने प्रतिसिलिंडर २०० रुपयांचा नफा अड्डेचालक कमावतात. प्रत्येक अड्ड्यावर दररोज २५ ते ३० सिलिंडर खर्ची होतात. त्यामुळे दिवसाकाठी ५ ते ६ हजार रुपयांचा नफा त्यांना मिळतो.

महापालिका क्षेत्रात सिलिंडर काळाबाजार जोमात

सिलिंडरचा इतक्या मोठ्या प्रमाणात या अड्डेचालकांना पुरवठा करणाऱ्या एकूण चार एजन्सीज आहेत. त्या एजन्सीचे कर्मचारी ठिकठिकाणी हे सिलिंडर उतरवितात. अड्डेचालकाची मुले ती दुचाकी व चारचाकी वाहनातून अड्ड्यावर आणतात.

 जागा बदलून अड्डे सुरू

‘लोकमत’ने या विषयावर आवाज उठविल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी हे अड्डे बंद झाले होते. मात्र, पुन्हा या माफियांनी तोंड वर काढले असून, काहींनी जागा बदलून, तर काहींनी आहे त्याच ठिकाणी अड्डे सुुरू केले आहेत. गॅस भरून घेणाऱ्या काही वाहनचालकांनी दिलेल्या माहितीनुसार मिरजेत सध्या २०, सांगलीत ८ व कुपवाडला ३ ठिकाणी असे गॅस भरणा केंद्र आहेत. 

हप्तेखोरीचा बाजार गरम

ज्या शासकीय कार्यालयांचा त्रास या अड्डेचालकांना होऊ शकतो त्याच यंत्रणांचे खिसे गरम करण्याचा सर्वमान्य फंडा या व्यावसायातही आहे. त्यामुळेच उजळ माथ्याने अनेकांनी बेकायदेशीर उद्योगात हात-पाय पसरले आहेत.

सावळीला कारवाई; अन्यत्र का नाही?

सावळीमध्ये नुकतीच पोलिसांनी अशाच एका भरणा केंद्रावर कारवाई करुन मोठा सिलिंडर साठा जप्त केला. महापालिका क्षेत्रातही अशी कारवाई हवी.

Web Title: Illegal gas cylinder filling station at Sangli, Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.