विटा येथे बेकायदा शासकीय धान्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:21 AM2021-01-15T04:21:47+5:302021-01-15T04:21:47+5:30
विटा : विटा येथील कऱ्हाड रस्त्यावर पोल्ट्री फार्मच्या पाठीमागे विनापरवाना बेकायदा शासकीय धान्याचा साठा केलेल्या गोदामावर पुरवठा विभागाने बुधवारी ...
विटा : विटा येथील कऱ्हाड रस्त्यावर पोल्ट्री फार्मच्या पाठीमागे विनापरवाना बेकायदा शासकीय धान्याचा साठा केलेल्या गोदामावर पुरवठा विभागाने बुधवारी छापा टाकला. यावेळी गोदामात स्वस्त धान्य दुकानदारांना पुरविण्यात येणारे ११० क्विंटल तांदूळ व ४९ क्विंटल गहू प्रशासनाने जप्त केला असून गोडावून सील केले आहे. जास्त दराने विक्री करण्यासाठी केलेला शासकीय धान्याचा काळाबाजार उघडकीस आला आहे.
विटा ते कऱ्हाड रस्त्यावर शहरापासून दीड कि.मी. अंतरावर तुकाराम भाऊ गायकवाड यांच्या मालकीचे गोदाम आहे. हे गोदाम रामभाऊ आनंदराव सपकाळ यांना भाडेतत्त्वावर चालविण्यास दिले आहे. त्यामध्ये शासकीय धान्याचा बेकायदा साठा होत असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली होती.
त्यानुसार मनसेचे तालुकाध्यक्ष साजीद आगा, कृष्णात देशमुख यांनी तहसीलदार ऋषीकेश शेळके यांच्याकडे तक्रार केली. तहसीलदारांनी बुधवारी निवासी नायब तहसीलदार एस. एस. साळुंखे, पुरवठा निरीक्षक टी. आर. गुरव यांना गोडावूनवर छापा टाकण्याची सूचना दिली.
बुधवारी सायंकाळी ४ वाजता शेळके व गुरव यांच्यासह पोलिसांनी छापा टाकल्यानंतर गोडाऊनमध्ये प्रत्येकी ५० किलो वजनाची २१० तांदळाची पोती व ९८ गव्हाची पोती सापडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
चौकट :
शासकीय पोत्यांची पलटी
शासकीय धान्य दुसऱ्या पोत्यात भरून शासनाचा शिक्का असलेले पोते जाळून टाकले जात होते तसेच त्याठिकाणी शासकीय धान्याच्या पोहोच पावत्याही प्रशासनाला सापडल्या असल्याचे समजते. त्यामुळे साठवणूक केलेले धान्य हे शासकीय असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चौकट :
मोठे रॅकेट
शासनाने प्राधान्य कुटुंब, अंत्योदय, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना सवलतीच्या दरात धान्य देण्याची योजना सुरू केली आहे. बायोमेट्रीक मशीनमुळे धान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोच होते की नाही याची माहिती प्रशासनाला मिळत असते तरीही बरेचसे धान्य दुकानदार मुदत संपल्याचे सांगून लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित ठेवतात.