हॅलो..! तुमच्या पार्सलमध्ये बेकायदा वस्तू, सीबीआयच्या अटक वॉरंटची भीती; फसवणुकीचा नवा फंडा

By घनशाम नवाथे | Published: July 23, 2024 12:19 PM2024-07-23T12:19:16+5:302024-07-23T12:22:33+5:30

न्यायालयाचे बनावट पत्र, तरुणीच्या सावधानतेमुळे फसवणुकीचा प्रकार रोखला गेला

Illegal items found in parcel, call to girl in Sangli saying arrest warrant issued against you | हॅलो..! तुमच्या पार्सलमध्ये बेकायदा वस्तू, सीबीआयच्या अटक वॉरंटची भीती; फसवणुकीचा नवा फंडा

हॅलो..! तुमच्या पार्सलमध्ये बेकायदा वस्तू, सीबीआयच्या अटक वॉरंटची भीती; फसवणुकीचा नवा फंडा

घनशाम नवाथे

सांगली : ‘हॅलो कस्टममधून बोलतोय..तुमचे पार्सल एअरपोर्टमध्ये थांबवले आहे असे सांगून फोन पोलिस ठाण्याशी कनेक्ट करून दिल्याचे भासवले जाते. मग व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉल येतो. तुमची एकप्रकारे ‘डिजिटल कस्टडी’ घेतली जाते. समोरून तथाकथित सीबीआयचा अधिकारी तुमच्याशी बोलतो. पार्सलमध्ये बेकायदेशीर गोष्टी सापडल्या आहेत, तुमच्यावर अटक वॉरंट काढल्याचे सांगितले जाते. व्हॉट्सॲपवर बनावट वॉरंट पाठवले जाते. जामिनासाठी पैशाची मागणी केली जाते. घाबरून अनेकजण याला बळी पडतात. ‘पार्सल स्कॅम’ च्या नावाखाली गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन फसवणुकीचा नवा फंडा सुरू आहे.

सांगलीत रविवारी सुटीच्या दिवशी एका तरुणीला कस्टम ऑफीसमधून बोलतोय, असे सांगून कॉल आला. समोरून दिल्लीतील एअर पोर्टवर तुमचे पार्सल थांबवण्यात आल्याचे सांगितले. पार्सलमध्ये अनेक एटीएम, आधारकार्ड तसेच बेकायदेशीर गोष्टी असल्याचे सांगताच तरुणी घाबरली. तिने माझे कोणतेही पार्सल नाही म्हणून सांगितले. तेवढ्यात समोरून पोलिसांशी कॉल कनेक्ट करून दिला गेला. त्यांच्याकडून व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवण्यात आले. व्हिडीओ कॉल करण्यात आला. व्हिडीओवर तरुणी त्यांना दिसत होती; परंतु समोरून बोलणाऱ्याने त्याचा व्हिडीओ बंद केला होता.

सीबीआयच्या कार्यालयातून बोलत आहेत, असे भासवून संवाद सुरू झाला. तरुणीला तुम्ही मलेशियाला पार्सल पाठवले होते. त्यात अनेक बेकायदेशीर गोष्टी आढळल्या आहेत. तुमची टोळी आहे. तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अटक वॉरंट काढण्यात आले आहे. तुम्हाला जामीन करून घ्यायचा असेल तर दहा हजार रुपये भरा, नाहीतर अटक करावी लागेल, असे सांगितले. पैसे नाही म्हणून तरुणीने सांगताच पाच हजार रुपये भरण्यास सांगितले. जवळपास दोन तासाच्या संवादात पैशासाठी हा प्रकार सुरू असल्याचे समजताच तरुणीने सावध होऊन कॉल बंद केला. त्यामुळे फसवणुकीचा प्रकार रोखला गेला.

दोन तास ‘डिजिटल कस्टडी’

तरुणीला व्हिडीओ कॉल केल्यानंतर जवळपास दोन तास ओरडून पोलिस अधिकारी असल्याचे भासवून दबाव टाकला जात होता. जामीन न मिळाल्यास अटकेची भीती घालण्यात आली. सायबर क्राईममध्ये या प्रकाराला ‘डिजिटल कस्टडी’ म्हंटले जाते.

न्यायालयाचे बनावट पत्र

सायबर गुन्हेगारांनी तरुणीला दिल्लीतील न्यायालयाचा शिक्का, राजमुद्रा असलेले अटक वॉरंट, मालमत्ता जप्ती आदेश पत्र व्हॉट्सॲपवर पाठवून घाबरवण्याचा प्रयत्न केला. तसेच सीबीआय अधिकाऱ्याचे बनावट ओळखपत्रही पाठवले होते.

पाच ते सहा घटना

चार महिन्यांपूर्वी सांगलीतील एका डॉक्टरना तुम्ही चीनला पाठवलेल्या पार्सलमध्ये बेकायदा वस्तू असल्याचे सांगून कारवाईच्या नावाखाली १९ लाख रुपयांना गंडा घातला होता. त्यानंतर अशा प्रकारच्या पार्सल स्कॅमच्या नावाखाली फसवणुकीच्या सांगली जिल्ह्यात पाच-सहा घटना घडल्या आहेत. कालच्या घटनेत फिर्यादींनी सावध होऊन पैसे दिले नाहीत. त्यामुळे पुढील फसवणुकीचा प्रकार टळला.

फसवणुकीचे नवनवीन फंडे..

‘पार्सल स्कॅम’ च्या नावाखाली फसवणुकीच्या प्रकारात बेकायदा वस्तू, मनी लॉन्ड्रींग, दहशतवादी कारवाईशी संबंध दाखवून भीती घातली जाते. खात्यातील रक्कम जमा करा चौकशीनंतर परत खात्यात पाठवतो, असे सांगून आरटीजीएस माध्यमातून रक्कम घेतली जाते. सांगलीतील डॉक्टर या प्रकाराला बळी पडले होते.

Web Title: Illegal items found in parcel, call to girl in Sangli saying arrest warrant issued against you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.