सांगली जिल्ह्यातील नरवाडच्या हद्दीत मुरुमाचे बेकायदा उत्खनन, संबंधित शेतकऱ्यास १ कोटीचा दंड
By श्रीनिवास नागे | Published: December 6, 2022 05:10 PM2022-12-06T17:10:42+5:302022-12-06T17:11:26+5:30
मिरज तालुक्यातील आजवरची मोठी कारवाई
सांगली : मिरज तालुक्यातील नरवाडच्या हद्दीत बेकायदा मुरुमाचे उत्खनन करणाऱ्या शेतकऱ्यांना मिरजेचे तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी १ कोटी ३२ लाख रुपये दंडाची नोटीस बजावली आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमेलगत शेडबाळ हद्दीजवळ नरवाड येथील गट क्रमांक ४८२ मध्ये गुंडू आप्पासाहेब शिरसागर या कागवाडच्या शेतकऱ्याने जमीन घेतली आहे. संबंधित शेतकऱ्याने महसूल विभागाची कोणतीही परवानगी न घेता दोन हजार ब्रास मुरुम उचलला आहे.
बेकायदा मुरुमाचे उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच नरवाडचे तलाठी आर. आर. कारंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन मुरूम भरलेला डंपर पकडला. गुंडू शिरसागर या शेतकऱ्याने विनापरवाना मुरुमाचे उत्खनन केलेल्या जागेचा पंचनामा करून व डंपर मुरुमासह पकडून तहसीलदारांच्या ताब्यात दिले.
मिरज तालुक्यातील आजवरची ही मोठी कारवाई असून बेकायदा शेतातील मुरुमाचे उत्खनन करणाऱ्या शेतकऱ्याला १ कोटी ३२ लाख ३ हजार ६९० रुपये दंडाची नोटीस तहसीलदार कुंभार यांनी बजावली आहे.
याशिवाय बेकायदा मुरुमाची वाहतूक करणाऱ्या विनायक इन्फ्राटेक कंपनीला २ लाख ३९ हजार रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेलगत नरवाड हद्दीत कोणीही विनापरवाना मुरुमाचे उत्खनन करू नये, अन्यथा कठोर कारवाईचा इशारा तलाठी कारंडे यांनी दिला आहे.