बेकायदा वाळू उपसा; पाचजणांवर गुन्हा महसूल विभागाची कारवाई : एक कोटींचा माल जप्त
By admin | Published: May 14, 2014 12:00 AM2014-05-14T00:00:07+5:302014-05-14T00:01:23+5:30
इस्लामपूर : कोळे व खरातवाडी (ता. वाळवा) येथील कृष्णा नदीपात्रात परवान्यापेक्षा जादा यांत्रिक बोटींचा वापर करून वाळू उपसा करणार्या दोघा
इस्लामपूर : कोळे व खरातवाडी (ता. वाळवा) येथील कृष्णा नदीपात्रात परवान्यापेक्षा जादा यांत्रिक बोटींचा वापर करून वाळू उपसा करणार्या दोघा ठेकेदारांसह बहे येथील नदीपात्रातून वाळूची खुलेआम चोरी करणार्या एकाविरुद्ध तहसीलदारांच्या आदेशाने पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत वाळू उपशासाठी मळीची जमीन देणार्या दोन शेतकर्यांचाही गुन्ह्यात समावेश आहे. काल रात्री छापा टाकून महसूलच्या पथकांनी कारवाई केली. या कारवाईत ३६७ ब्रास वाळू, २२ यांत्रिक बोटी, ५ पोकलँड मशीन असा जवळपास एक कोटीचा मुद्देमाल हस्तगत केला. महेश विलासराव पाटील (नरसिंहपूर, ता. वाळवा), प्रमोद तानाजीराव कदम (रा. पेर्ले, ता. कºहाड), शशिकांत दत्तात्रय पाटील (रा. जुनेखेड, ता. वाळवा) या वाळू उपसा करणार्यांसह त्यांना जमीन उपलब्ध करून देणार्या जालिंदर महादेव पवार, निवृत्ती श्रीपती जाधव (दोघे, रा. हुबालवाडी, ता. वाळवा) या शेतकर्यांवर वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलाठी पंडित बाबूराव चव्हाण आणि विनोद मनोहर कांबळे यांनी रात्री उशिरा पोलिसांत फिर्याद दिली आहे. वाळू माफियांविरोधातील या कारवाईमुळे तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे. प्रशासनाने हस्तगत केलेला मुद्देमाल त्या-त्या गावच्या पोलीसपाटलांच्या ताब्यात दिला आहे. बेकायदा वाळू उपशा विरुद्ध आलेल्या तक्रारी विचारात घेऊन तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी काल रात्री ही कारवाई केली. कोळे हद्दीत अधिकृत लिलावधारक महेश पाटील हा परवान्यापेक्षा दहा यांत्रिक बोटींचा जास्तीचा वापर करून वाळू उपसा करताना आढळून आला. १ लाख ४२ हजार किमतीची १३५ ब्रास वाळू, दहा यांत्रिक बोटी आणि दोन पोकलँड असा माल पथकाच्या हाती लागला. त्यानंतर बहे येथील नदी पात्रात शशिकांत दत्तात्रय पाटील (जुनेखेड) हा परवाना न घेता खुलेआम वाळू उपसा करीत असल्याची माहिती मिळाल्यावर मंडल अधिकारी बबन करे, तलाठी पंडित चव्हाण, विनोद कांबळे यांच्या पथकाने छापा टाकला. तेथे एक लाख रुपये किमतीची २५ ब्रास वाळू आणि एक पोकलँड हस्तगत करण्यात आले. वाळू चोरीसाठी मळीची जमीन देणार्या जालिंदर पवार, निवृत्ती जाधव या शेतकर्यांवरही गुन्हा नोंदविण्यात आला. खरातवाडी हद्दीत पेर्ले येथील प्रमोद कदम यांच्या वाळू उपसा केंद्रावर छापा मारून पथकाने १२ यांत्रिक बोटी, दोन पोकलँड मशीन आणि २0७ ब्रास वाळू असा ५४ लाख ७५ हजारांचा माल जप्त केला. (वार्ताहर)