दरीबडचीत अवैध वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:25 AM2021-03-25T04:25:47+5:302021-03-25T04:25:47+5:30
फोटो ओळ : दरीबडची (ता. जत) येथील ओढा पात्रात अवैध वाळूचा उपसा करताना महसूल विभागाच्या पथकाने ट्रॅक्टर जप्त केला. ...
फोटो ओळ : दरीबडची (ता. जत) येथील ओढा पात्रात अवैध वाळूचा उपसा करताना महसूल विभागाच्या पथकाने ट्रॅक्टर जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : जत तालुक्यातील दरीबडची ओढा पात्रात अवैध वाळू उपसा करताना महसूल विभागाच्या पथकाने गोपाळ विठ्ठल माळी (रा. दरीबडची) यांच्या मालकीचा ट्रॅक्टर पकडला. संखचे अपर तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांच्या पथकाने मंगळवारी रात्री तीन वाजता छापा टाकून ही कारवाई केली. यावेळी ट्रॅक्टरचा पंचनामा करुन माळी यांना १ लाख ४९ हजार ७५० रुपयांंचा दंड करण्यात आला.
जत पूर्व भागातील बोर नदीचे पात्र वाळू तस्करीचे केंद्र बनले आहे. नियमित वाळू उपसा होत असल्यामुळे पाण्याची पातळी कमी होत आहे. कोट्यवधी रुपयांच्या काळ्या सोन्याची येथून राजरोस तस्करी सुरु आहे. ओढालगतच्या शेतकऱ्यांंच्या शेतीचेही यामुळे मोठे नुकसान होत आहे. या वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाला कारवाईचे आदेश दिले आहेत.
अपर तहसीलदार म्हेत्रे व त्यांच्या पथकाने मंगळवारी रात्री तीन वाजता गस्त घालताना दरीबडची-तिकोंडी ओढा पात्रात अवैध वाळू उपसा करताना बिगर क्रमांकाचा ट्रक्टर पकडला. हा ट्रॅक्टर चार वाजता अपर तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला. अपर तहसीलदार हणमंत म्हेत्रे, तलाठी गणेश पवार, राजेश चाचे, नितीन कुंभार, स्वप्नील घाटगे, विनायक बालटे, अभिजीत सोनपरोते, राहुल कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
चाैकट
बंदोबस्त करा
आठवड्यातून एखादी कारवाई न करता, कायमस्वरूपी कारवाई करुन अवैध वाळू उपसा कायमचा बंद करावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.