जत उत्तर भागात बेकायदेशीर वाळू तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:24 AM2021-01-22T04:24:41+5:302021-01-22T04:24:41+5:30
शेगाव : जत तालुक्याच्या उत्तर भागात वाळू तस्करांनी थैमान घातले आहे. या वाळू तस्करीमुळे कोरडा नदी व वाळेखिंडी ओढापात्राची ...
शेगाव : जत तालुक्याच्या उत्तर भागात वाळू तस्करांनी थैमान घातले आहे. या वाळू तस्करीमुळे कोरडा नदी व वाळेखिंडी ओढापात्राची पूर्णतः वाट लागली आहे. नदी, ओढापात्रालगतच्या शेतकऱ्यांच्या सुमारे एक हजार पाचशे एकर शेतजमिनीवरील पिकांना धोका निर्माण झाला आहे. काही वर्षांपूर्वी ट्रॅक्टरने वाळू तस्करी सुरू होती. मात्र जेसीबीच्या साहाय्याने जोरदार वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र आहे. या बेकायदेशीर वाळू तस्करांची दहशत असल्याने एकही शेतकरी तक्रार करण्यास पुढे येत नाही.
जत तालुक्याच्या उत्तर भागात वाळेखिंडी गावालगत अपूर्वाई ओढा आहे, तर कोरडा नदी ही कोसारी, शेगाव, काशिलिंगवाडी, वाळेखिंडी, बागलवाडी, सिंगनहळी या गावांच्या शेतीच्या लाभक्षेत्रात आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने या ओढा व नदीपात्रातून पाण्याच्या वेगाने काही प्रमाणात वाळूसाठा झाला आहे. या नदीपात्रालगत अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी आहेत, तर पाणी अडविण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचे चार सिमेंट बंधारे आहेत. शिवाय या सहा गावांतील सुमारे एक हजार पाचशे एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू आदी पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत.
या परिस्थितीत वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू केला आहे. त्यामुळे पाणीसाठे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांनी वारंवार तोंडी तक्रार करूनही वाळू तस्करांवर कारवाई होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जेसीबी यंत्रामार्फत होणाऱ्या कोरडा नदी व वाळेखिंडी ओढापात्रातील बेसुमार वाळू उपशाने १० ते २० फूट खोल मोठे खड्डे पडले आहेत. हा वाळू उपसा रात्री अकरा ते पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सुरू असल्याने महसूल विभागाला याचा थांगपत्ता काहीवेळा लागत नाही. तसेच वाळू तस्करांचे खबरे महसूल अधिकाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी गावाच्या बाहेरील प्रमुख रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने वाळू तस्करी जोमात सुरू आहे. वाळू तस्करी रोखणे हे महसूल अधिकाऱ्यापुढे एक आव्हान बनले आहे.