पात्रेवाडीत झाडांची बेकायदा कत्तल
By admin | Published: May 6, 2016 11:23 PM2016-05-06T23:23:50+5:302016-05-07T00:58:17+5:30
मुख्याध्यापकाकडून प्रकार : आटपाडी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार
आटपाडी : पात्रेवाडी (ता. आटपाडी) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या आवारातील जुन्या लिंब आणि सुबाभूळ झाडांची तोड करून त्यांची मुख्याध्यापकाने परस्पर विक्री केल्याचा प्रकार घडला आहे. मोठी १० झाडे तोडल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
झाडे तोडा आणि पैसे कमवा!
आटपाडी पंचायत समितीच्या अनेक विभागातील भोंगळ कारभाराच्या तक्रारींमध्ये अलीकडे वाढ झाली आहे. कर्मचारी बेलगाम झाले आहेत. मुख्याध्यापकानेच शाळेच्या आवारातील झाडे तोडून विकली, तरीही ग्रामस्थांच्या लेखी तक्रारीची अधिकारी वाट पाहत बसले. या गंभीर प्रकाराबाबत आता काय कारवाई केली जाणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पात्रेवाडी येथे इयत्ता १ ली ते ४ थी अशी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेच्या आवारात सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी लावलेली लिंबाची आणि सुबाभळीची झाडे होती. ही झाडे गुरुवारी मुख्याध्यापक कचरे यांनी बेकायदेशीरित्या तोडली. या झाडांची त्यांनी विक्रीही केल्याचा ग्रामस्थ आरोप करीत आहेत. ही झाडे तोडण्यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभाग, गटविकास अधिकरी अथवा वनीकरण विभाग यापैकी कुणाचीही परवानगी घेतली नाही. याबाबत पात्रेवाडीचे माजी सरपंच भीमराव रामचंद्र जाधव यांनी गटविकास अधिकारी सौ. मीना साळुंखे यांच्याकडे तक्रार केली आहे. याबाबत पात्रेवाडीचे माजी सरपंच भीमराव जाधव म्हणाले की, हा भाग सतत दुष्काळी आहे. या भागात जास्तीत जास्त झाडे लावण्याची गरज असताना, मुख्याध्यापक कचरे यांनी बेकायदेशीररीत्या झाडे तोडून विकली आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई केली नाही, तर ग्रामस्थांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडू. (वार्ताहर)