इस्लामपुरात बेकायदा थेरपी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 11:58 PM2018-04-27T23:58:28+5:302018-04-27T23:58:28+5:30

Illegal Therapy Center at Islampur | इस्लामपुरात बेकायदा थेरपी केंद्र

इस्लामपुरात बेकायदा थेरपी केंद्र

Next

अशोक पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरातील जुन्या भाजी मंडई परिसरात हेल्थ एनर्जीच्या नावाखाली मोफत थेरपी केंद्र चालविले जात आहे. त्यामुळे या केंद्रामध्ये उपचार घेण्यासाठी रुग्णांची मोठी गर्दी होते. परंतु हा सर्व प्रकार बेकायदेशीर असून, अशा उपचाराची रुग्णांना सवय लावून त्यांच्या गळ्यात लाखो रुपये किमतीची यंत्रे मारली जात आहेत. याकडे उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे.
काही वर्षांपूर्वी इस्लामपूर बसस्थानक रस्त्यावर अशाच प्रकारचे केंद्र ‘सेराजेम’ या नावाने सुरू केले होते. गुडघे, मणके, सांधेदुखीचा त्रास असणाºया रुग्णांना तेथे मोफत उपचार दिले जात होते. या उपचाराची सवय लागल्यानंतर ४0 ते ५0 हजार रुपये किमतीचे यंत्रच रुग्णाला खरेदी करण्यासाठी आग्रह केला जात होता. यावर ‘लोकमत’ने आवाज उठवून ते केंद्र बंद पाडले होते.
आता पुन्हा इस्लामपुरात थेरपी करणारे केंद्र हेल्थ एनर्जीच्या नावाखाली सुरू झाले आहे. येथे सांधे, गुडघेदुखी, मणक्याचे आजार तसेच इतर अनेक आजारांवर मोफत थेरपी केली जात आहे. मोफत उपचार होत असल्याने येथे शहरासह परिसरातील गावांतून आलेले अनेक रुग्ण पहाटेपासूनच उपचारासाठी रांगा लावून बसतात. येथेही रुग्णांना उपचाराची सवय लावून पन्नास हजारपासून दीड लाख किमतीच्या यंत्राची विक्री केली जात आहे.
या केंद्राला आरोग्य विभागाची परवानगी नाही. या थेरपीवेळी एखाद्या रुग्णाला त्रास होऊ लागला, तर त्याच्यावर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर नाही. येथे फक्त विपणन प्रतिनिधीच उपस्थित असतात. तेच या यंत्राचा कसा वापर करायचा, याची माहिती देतात आणि थेरपी यंत्राची विक्री करत आहेत.
केवळ प्रात्यक्षिक, तर तेच ते रुग्ण का?
हेल्थ एनर्जी या केंद्राचे व्यवस्थापक प्रशांत कारंजकर ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, रुग्णांना ही थेरपी कशी वापरावयाची याचे प्रात्यक्षिक दाखवतो. या सेंटरद्वारे मॅट आणि बेडची विक्री केली जाते. त्याची किंमत ५0 हजार ते दीड लाखांपर्यंत आहे. जर येथे केवळ प्रात्यक्षिक दाखवले जाते, तर मग दररोज तेच तेच रुग्ण का येतात, हा प्रश्न आहे. यातूनच यंत्र वापरण्याची सवय लावून ती रुग्णाच्या गळ्यात मारायची, असाच धंदा सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: Illegal Therapy Center at Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.