तासगावमध्ये अवैध धंदे जोमात

By admin | Published: June 10, 2017 12:32 AM2017-06-10T00:32:08+5:302017-06-10T00:32:08+5:30

तासगावमध्ये अवैध धंदे जोमात

Illegal trade zoom in Tasgaon | तासगावमध्ये अवैध धंदे जोमात

तासगावमध्ये अवैध धंदे जोमात

Next


दत्ता पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : तासगाव तालुक्यात काही महिन्यांपासून अवैध धंद्यांचा मोठा सुळसुळाट सुरु आहे. शहरासह तालुक्यातील मोठ्या गावांतील ढाब्यांवर, हॉटेलमध्ये बेकायदा अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत. दारुबंदीच्या निर्णयानंतरही तालुक्यात काही ठिकाणी राजरोसपणे दारु विक्री, खुलेआमपणे मटका आणि बेकायदा वाळू तस्करी सुरुच असल्याचे चित्र आहे.
पोलिस ठाण्यातीलच काही कर्मचाऱ्यांचे या अवैध धंदेवाल्यांशी आर्थिक हितसंबंध असल्याची चर्चा आहे. नूतन पोलिस निरीक्षक राजन माने यांना अशा कर्मचाऱ्यांचे अवैध धंदेवाल्यांशी असलेले लागेबांधे मोडीत काढून अवैध धंदेवाल्यांवर वचक निर्माण करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.
तासगाव तालुक्यात काही महिन्यांपासून अवैध धंदेवाल्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. तासगाव शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी मटक्याचे अड्डे सुरु आहेत. शहरात अनेक ठिकाणी राजरोसपणे मटका सुरु आहे. शहरातील बड्या मटका बुकींचा अनेकदा पोलिस ठाण्याच्या परिसरात वावर असतो. काही पोलिस कर्मचाऱ्यांशी सातत्याने हे बुकी संपर्कात असतात. काही दिवसांपूर्वी या बड्या मटका बुकींच्या अड्ड्यावरच सांगलीतील विशेष पोलिस पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली होती.
तालुक्यातील अशा अनेक मोठ्या कारवाया या सांगलीतील पोलिस पथकानेच केलेल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव आल्यानंतरच तासगावातून कारवाईचे सोपस्कार पार पाडले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. मटक्यासोबतच बेकायदा दारू विक्रीलाही काही दिवसांपासून उधाण आले आहे. महामार्गावरील दारुविक्री बंदच्या निर्णयानंतर तालुक्यातील अनेक बिअर बारना टाळे लागले आहे. मात्र तेव्हापासून तालुक्यात अनेक ढाब्यांवर, बारवर विनापरवाना दारु विक्री होत आहे. काही परमीट रुम मालकांकडून परवाना नसतानादेखील खुलेआमपणे दारु विक्री केली जात आहे. उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांसमवेत तालुक्यातील पोलिसांचेही या दारुविक्रेत्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
दुसरीकडे बेकायदा दारु विके्रेत्यांकडून दीडपट ते दुप्पट दराने दारु विक्री होत असल्याचेही चित्र आहे. अशा अनेक ढाबे आणि परमीट रुमवर पोलिस ठाण्यातील काही वसुलीबहाद्दरांचा वावर सातत्याने सुरु असल्याचे चित्र असून, याबाबत नागरिकांत चर्चा होत आहे.
तासगावातील अग्रणी नदी, येरळा नदीसह अन्य काही ठिकाणांहून बेकायदा वाळूचा उपसा होतो, तर सोलापूर जिल्ह्यातून बेकायदा चोरट्या वाळूची तस्करीही मोठ्या प्रमाणात तालुक्यातून सुरु आहे. पोलिसांकडून या वाळू तस्करीविरोधात कारवाई होत नाही. याउलट वाळू तस्करांकडून बेकायदा वाहतुकीच्या मोबदल्यात वसुलीचा फंडा राबवला जात आहे.
तासगाव पोलिस ठाण्यातील काही मोजक्याच कर्मचाऱ्यांचे तालुक्यातील अवैध धंदेवाल्यांसोबत लागेबांधे आहेत. या लागेबांध्यातून तालुक्यात राजरोसपणे अवैध धंदेवाल्यांनी तोंड वर काढले आहे. या अवैध धंदेवाल्यांना राजकर्त्यांचा छुपा पाठींबा असल्यामुळे त्यांचे उद्योग राजरोसपणे सुरु असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

Web Title: Illegal trade zoom in Tasgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.