जतला जिल्हा बँक कर्मचाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:32 AM2021-09-07T04:32:39+5:302021-09-07T04:32:39+5:30
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जत तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आमदार विक्रम सावंत यांनी वैयक्तिक कारणातून नियमबाह्य बदल्या केल्या ...
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जत तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आमदार विक्रम सावंत यांनी वैयक्तिक कारणातून नियमबाह्य बदल्या केल्या आहेत, अशी तक्रार माजी आमदार विलासराव जगताप यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.
या निवेदनात जगताप यांनी म्हटले आहे की, मुख्य कार्यालय, सांगली येथून जत तालुक्यातील बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेमध्ये काही बदल्या पाहिल्या तर बदल्यांमध्ये झालेला घोटाळा लक्षात येईल. दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांना मुख्य पदावर बसविण्यात आले आहे, त्यामुळे असंतोष आहे. एका वर्षामध्ये काही विशिष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या अनेकवेळा केल्या आहेत.
बँकेचे विद्यमान संचालक व आमदार विक्रम सावंत यांनी राजकीय सूड भावनेने, बेकायदेशीर कामे न ऐकल्याने तसेच वैयक्तिक न भेटल्याने बदल्या केल्या आहेत. भविष्यात राजकीय मदत करण्याचे नाकारल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे बँक कर्मचारी व अधिकारी यांच्यामध्ये मोठा असंतोष असून, त्याचा वसुलीवर व कर्ज वाटपावर गंभीर परिणाम होणार आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पात्रतेप्रमाणे योग्य ठिकाणी बदल्या कराव्यात, झालेल्या बदल्यांना स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार जगताप यांनी केली आहे.