घरकुलाच्या निधीचा बेकायदेशीर वापर
By admin | Published: November 20, 2015 11:30 PM2015-11-20T23:30:40+5:302015-11-21T00:23:29+5:30
दिवाबत्तीची बिले काढली : महापालिका स्थायी समितीत विषय गाजणार
सांगली : महापालिकेच्या घरकुल योजनेकडील शासकीय निधीतून दिवाबत्तीच्या ठेकेदाराला सुमारे एक कोटी रुपयांची बिले अदा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आता या प्रकरणात सारवासारव करण्यासाठी रक्कम तबदिलचा विषय स्थायी समितीसमोर आणण्यात आला. वास्तविक घरकुलाचे काम पाहणाऱ्या नगरअभियंत्यांनी बेकायदेशीर निधीची गैरवापर केल्याचे स्पष्टपणे म्हटले असतानाही विद्युत अभियंत्यावर कारवाई करण्याऐवजी त्यावर पांघरूण घालण्याचाच प्रयत्न महापालिकेत सुरू आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीची शनिवारी सभा होत आहे. या सभेत दिवाबत्ती ठेकेदाराला दिलेल्या एक कोटी रुपयांच्या बिलाची रक्कम इतर लेखाशीर्षात तबदिल करण्याचा विषय अजेंड्यावर घेतला आहे. ही रक्कम विद्युत विभागाच्या शिफारशीवरून शासकीय निधीतून देण्यात आली आहे. घरकुल योजनेची रक्कम इतर विभागाच्या बिलासाठी कशी खर्च केली जाऊ शकते, हा खरा प्रश्न आहे.
याबाबत घरकुलचे नगरअभियंत्यांनी वरिष्ठांकडे टिपणी सादर केली आहे. त्यात एक कोटीच्या निधीचा गैरवापर झाल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. हा एक कोटीचा निधी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेकडे वर्ग करावा, अशी मागणीही केली आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून विद्युत अभियंत्याच्या घोटाळ्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.
याबाबत विद्युत अभियंत्याकडूनही खुलासा घेण्यात आला आहे. त्यात त्यांनी देखभाल दुरुस्तीच्या लेखाशीर्षाकडे रक्कम कमी असल्याने व ठेकेदाराचे बिल देणे क्रमप्राप्त असल्याने शासकीय खात्यातून बिल अदा केल्याचे मान्य केले आहे. शिवाय भविष्यात अशाप्रकारे इतर खात्यामधून विद्युत विभागाची बिले अदा करणार नाही, असे नमूद केले आहे. यावरून विद्युत अभियंत्यांनीही आपली चूक कबूल केल्याचेच चौकशीमध्ये स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)
निधी कमी पडणार
महापालिकेच्या अंदाजपत्रकात ११०५ पथदिवे विद्युत आकार या लेखाशीर्षावरील आॅक्टोबरअखेर ६ कोटीच्या तरतुदीपैकी दिवाबत्ती बिलापोटी ३ कोटी ७० लाख रुपये खर्च झाले आहेत. अजून २ कोटी ३० लाख शिल्लक आहेत. महापालिकेला दरमहा सरासरी ५२ लाख रुपयांचे वीजबिल येते. नोव्हेंबर ते मार्च या पाच महिन्यासाठी वीजबिलापोटी अडीच कोटीची गरज आहे. त्यात शिल्लक रकमेतील एक कोटी रुपये इतर विभागाकडे वर्ग केल्यास या खात्यात एक कोटी ३० लाख रुपये शिल्लक राहतील. त्यातून दोन ते तीन महिन्याचे वीजबिल देता येईल. त्यामुळे भविष्यात रस्त्यावरील दिवे बंद होऊन अंधार पसरण्याची शक्यता आहे.