तब्बल ३० वर्षांनंतर इस्लामपूर पालिकेच्या सभागृहात अवतरले वसंतदादा आणि बाळासाहेब ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 05:26 PM2022-01-03T17:26:15+5:302022-01-03T17:30:05+5:30
माजी नगराध्यक्ष स्व. एम. डी. पवार यांची सत्ता गेल्यानंतर सभागृहातून वसंतदादांची प्रतिमा गायब झाली होती.
इस्लामपूर : येथील नगरपालिकेच्या अण्णासाहेब डांगे सभागृहात आज सत्ताधारी विकास आघाडी आणि शिवसेनेने राज्याचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेले पद्मविभूषण वसंतदादा पाटील व हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा लावत राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडवून दिली.
१९८५ पूर्वी जवळपास ३० वर्षे पवार पार्टीची एकहाती सत्ता होती. माजी नगराध्यक्ष स्व. एम. डी. पवार हे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचे मानस पुत्र म्हणून राजकीय क्षेत्रात ओळखले जात होते. तसेच त्यांचा वसंतदादा पाटील यांच्याशीही जवळकीचे नाते होते. त्यामुळे त्यांना शहर आणि तालुक्याच्या राजकारणात मोठा मान होता. तोपर्यंत वसंतदादांचे छायाचित्र सभागृहात होते.
१९८५ साली पवार पार्टीची मोठी वाताहत झाली. या निवडणुकीत अत्यंत एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले. तत्कालीन नागरिक संघटनेने सत्ता मिळवली. त्यानंतर दादांची प्रतिमा गायब झाली. आज तब्बल ३० वर्षांनंतर विकास आघाडी-शिवसेनेने वसंतदादांची प्रतिमा कायमस्वरूपी राहील अशी व्यवस्था करत तिचे अनावरण केले.
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचेही गेल्या ३५ वर्षांपासून या शहराशी ऋणानुबंध जुळले होते. या भागात दौऱ्यावर आले की ते आठवणीने या शहराची विचारपूस करत असत. आज सभागृहात शिवसेनेचे ५ नगरसेवक जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय आहेत.त्यांच्या पुढाकाराने आज ठाकरे यांची प्रतिमसुद्धा सभागृहात विराजमान झाली.
नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, आनंदराव पवार, वैभव पवार, मुख्याधिकारी वैभव साबळे, शकील सय्यद, सीमा पवार, अन्नपूर्णा फल्ले, मंगल शिंगण, अजित पाटील, विजय पावर, सागर मलगुंडे उपस्थित होते.