सीसीआयएमच्या अधिसूचनेविरुध्द आयएमएचा लढ्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:29 AM2020-12-06T04:29:05+5:302020-12-06T04:29:05+5:30
इस्लामपूर : सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने (सीसीआयएम) प्रकाशित केलेल्या राजपत्रातील अधिसूचनेविरुध्द लढा देण्याचा निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशनने घेतला ...
इस्लामपूर : सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने (सीसीआयएम) प्रकाशित केलेल्या राजपत्रातील अधिसूचनेविरुध्द लढा देण्याचा निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशनने घेतला आहे. यामध्ये सीसीआयएमने सर्जिकल प्रक्रियेविषयीची सूचना मागे घ्यावी, यासह अन्य मागण्या आहेत. ८ डिसेंबर रोजी निदर्शने, तर ११ डिसेंबर रोजी संपूर्ण भारतभर वैद्यकीय सेवा बंद राहतील. त्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयएमएच्या इस्लामपूर शाखा अध्यक्ष डॉ. सीमा पोरवाल यांनी केले आहे.
डॉ. पोरवाल म्हणाल्या, आयुर्वेद हे महान शास्त्र आहे. त्यास मुळीच विरोध नाही. पण सीसीआयएमने अधिसूचनेत आयुर्वेदामधील शाल्य आणि शालाक्य या पदव्युत्तर उच्च शिक्षणाशी संबधित आहे. यामध्ये ५८ शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण दिल्यावर या वैद्यांना शस्त्रक्रिया स्वतंत्रपणे करता येतील, असे नमूद केले आहे. आयुर्वेदाच्या पदवीपूर्व अभ्यासात केवळ आयुर्वेदाचे मूलभूत विषय शिकवले जातात. त्यामुळे केवळ वरवरचे कौशल्य शिकवून रुग्णांवर प्राणघातक अन्याय होण्याची शक्यता ठरेल. त्यामुळे आयुर्वेदाच्या पदवीधारकांना बीएएमएस पदवीप्रमाणे ''''आयुर्वेद शाल्यविशारद''''अशी वेगळी पदवी द्यावी.
मिक्सोपॅथीला प्रोत्साहन देण्याच्या विचारात असलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या सर्व समित्या बरखास्त कराव्यात, भारत सरकारने सर्व प्रकारच्या वैद्यकीय शाखांमध्ये आणि प्रकारांमध्ये संशोधन कार्याला प्रोत्साहन द्यायला हवे, त्याचा विकास करण्याची भूमिका ठेवली पाहिजे, अशा मागण्या आयएमएने केल्या आहेत. याप्रश्नी दि.११ डिसेंबर रोजी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेत कोविड व अन्य अत्यावश्यक नसलेल्या सेवा वगळता संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर वैद्यकीय सेवा बंद राहतील. त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. पोरवाल यांनी केले आहे.
चाैकट
आरोग्यास गंभीर धोका
''''एम.एस'''' ही पदवी दिल्यामुळे रुग्णांना आपण कोणत्या सर्जनकडून उपचार घेणार आहोत, हे समजणे शक्य होणार नाही. वर्षानुवर्षे प्रशिक्षण घेऊन केल्या जाणाऱ्या अत्याधुनिक शल्यक्रियांचा सराव न केलेल्या अर्धप्रशिक्षित व्यक्ती सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करतील. यामध्ये शुध्द आयुर्वेदाची प्रगती न होता, ऱ्हास होईल.