प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी तात्काळ कार्यवाही सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 05:06 PM2019-02-07T17:06:11+5:302019-02-07T17:08:40+5:30
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रती शेतकरी कुटूंबाला प्रति वर्ष 6 हजार रूपये इतके आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सांगली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रती शेतकरी कुटूंबाला प्रति वर्ष 6 हजार रूपये इतके आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेचे काम वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम, समितीची कार्ये व जबाबदारी नेमून दिलेली आहेत. त्याची दिलेल्या मुदतीत काटेकोर अंमलबजावणी करावी. या कामी विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी व तात्काळ कार्यवाही करावी, असे आदेश अधिकाऱ्यांना देऊन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी शेतकऱ्यांनी बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक व इतर माहिती संबंधित गाव पातळीवरील अधिकाऱ्यांकडे तात्काळ जमा करावी, असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (ढट-ङकरअठ) योजना सुरू केली आहे. या योजनेबाबत जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत तर निवासी उपजिल्हाधिकारी हे समन्वय अधिकारी तथा जिल्हास्तरीय नोडल अधिकारी आहेत. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, डीस्ट्रीक्ट डोमेन एक्सपर्ट, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व जिल्हा अग्रणी बँक अधिकारी हे सदस्य आहेत. या सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सूचित केले.
जिल्हाधिकारी काळम म्हणाले, शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (ढट-ङकरअठ) योजना सुरू केली आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत प्रती शेतकरी कुटूंबाला प्रति वर्ष 6 हजार रूपये इतके आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय समिती गठीत करण्यात आल्या आहेत.
या समित्यांनी तात्काळ बैठका घ्याव्यात. तसेच, त्यांना प्रशिक्षण द्यावे. योजनेशी संबंधित सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवावा. निश्चित करून देण्यात आलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार माहिती संकलनाचा दैनंदिन आढावा घ्यावा. क्षेत्रीय स्तरावर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करावे, असे त्यांनी सूचित केले.
तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी आहेत तर तहसिलदार समन्वय अधिकारी तथा तालुकास्तरीय नोडल अधिकारी आहेत. तसेच उपविभागीय कृषि अधिकारी, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था हे सदस्य आहेत. या समितीने ग्रामस्तरावरून प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकरण करायचे आहे. कालबद्ध कार्यक्रमानुसार काम करत, संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी दिल्या.
ग्रामस्तरीय समितीचे समिती प्रमुख तलाठी आहेत. तसेच ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी, कृषी सहाय्यक व वि.का.से.स.सो. चे सचिव हे सदस्य आहेत. या समितीने शेतकरी कुटुंबाची निश्चिती करायची आहे. यासाठी राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम व कृषि गणनेची माहिती प्राप्त करून घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.