मेंढपाळ धनगर समाज बांधवांना तातडीने लस देऊ : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 01:54 PM2021-06-08T13:54:31+5:302021-06-08T16:51:05+5:30
Corona vaccine JayantPatil Sangli : उदरनिर्वाहासाठी राज्यातील मेंढपाळ धनगर समाज भटकंती करीत रानोमाळ फिरत असतो. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मेंढपाळ धनगर समाज बांधवांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत राज्य शासन पुढाकार घेऊन मेंढपाळ धनगर समाज बांधवांना तातडीने कोवीड लस दिली जाईल, अशी ग्वाही जलसंपदा तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
विटा (सांगली) : उदरनिर्वाहासाठी राज्यातील मेंढपाळ धनगर समाज भटकंती करीत रानोमाळ फिरत असतो. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मेंढपाळ धनगर समाज बांधवांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत राज्य शासन पुढाकार घेऊन मेंढपाळ धनगर समाज बांधवांना तातडीने कोवीड लस दिली जाईल, अशी ग्वाही जलसंपदा तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजूशेठ जानकर यांनी मेंढपाळ व्यवसायासाठी भटकंती करणाऱ्या धनगर समाज बांधवांना तातडीने लस देण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती. जानकर म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे धनगर समाज बांधव संकटात सापडला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरानाने बळी जाणाऱ्याची संख्याही लक्षणीय आहे.
वाढत्या कोरोनामुळे हातावर पोट भरणाऱ्या मेंढपाळ धनगर समाज बांधवांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात मेंढपाळ धनगर समाजबांधवांची संख्या आहे. वर्षातील आठ महिने मेंढपाळ गावातून बाहेर पडून भटकंती करीत असतात. त्यामुळे शासनाने याकडे गांभिर्यापूर्वक लक्ष देऊन मेंढपाळ धनगर समाज बांधवांना तातडीने कोरोना प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी मागणी राजूशेठ जानकर यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी मेंढपाळ धनगर समाज बांधवांना लस देण्यासाठी शासन पातळीवर तातडीने निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली.