‘महाराष्ट्रापेक्षा स्वस्त तेल’; कर्नाटकातील पंपांवर लागले फलक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 01:34 PM2021-11-15T13:34:55+5:302021-11-15T13:36:33+5:30

कर्नाटकात पेट्रोल सुमारे साडेनऊ रुपयांनी, तर डिझेल साडेसात रुपयांनी स्वस्त आहे. प्रवासासाठी कर्नाटकात गेलेली वाहने तेथूनच टाकी फुल्ल करून येत आहेत.

Impact on Maharashtra due to cheaper petrol and diesel in Karnataka | ‘महाराष्ट्रापेक्षा स्वस्त तेल’; कर्नाटकातील पंपांवर लागले फलक 

‘महाराष्ट्रापेक्षा स्वस्त तेल’; कर्नाटकातील पंपांवर लागले फलक 

Next

सांगली : कर्नाटकात पेट्रोल व डिझेल स्वस्त झाल्याने महाराष्ट्राच्या सीमाभागातील पंपांचे कंबरडे मोडले आहे. १ नोव्हेंबरला घेतलेला तेलाचा साठा अजूनही संपलेला नाही. मिरज आणि जत तालुक्यातील पंपांवर विक्री पूर्णता थंडावली आहे.


३ नोव्हेंबरला केंद्र सरकारने दरकपात केल्यापासून विक्री ठप्प आहे. म्हैसाळ, सलगरे, आरग, एरंडोलीसह जत तालुक्यातील पंप ओस पडले आहेत. पंपचालकांना लाखोंचे नुकसान सोसावे लागत आहे. कर्नाटकातील उगार, कागवाड, अथणी, मंगसुळी भागात पेट्रोल १००.३३ रुपये तर, डिझेल ८४.७९ रुपये लिटर दराने मिळत आहे. सांगली जिल्ह्याच्या सीमावर्ती गावांत पेट्रोलसाठी १०९.६९ रुपये तर डिझेलसाठी ९२.५१ रुपये मोजावे लागत आहेत. 
कर्नाटकात पेट्रोल सुमारे साडेनऊ रुपयांनी, तर डिझेल साडेसात रुपयांनी स्वस्त आहे. प्रवासासाठी कर्नाटकात गेलेली वाहने तेथूनच टाकी फुल्ल करून येत आहेत. ५० लिटर डिझेलमागे सुमारे पावणेचारशे रुपयांची बचत होत आहे. सीमाभागातील रहिवासी तर दररोजच्या इंधनासाठी गावातील पंप सोडून कर्नाटकात धाव घेत आहेत.


कर्नाटकातील पंपांवर ‘महाराष्ट्रापेक्षा स्वस्त तेल’ असे फलक लागले आहेत. याचा प्रचंड मोठा फटका सीमाभागातील पंपांना बसला आहे. दररोज दहा हजार लिटर इंधनविक्री करणाऱ्या पंपांवर सध्या दिवसभरात २००-३०० लिटर इंधनही खपत नसल्याचे चित्र आहे.


दरम्यान, राज्यभरातील पंपचालकांनी सरकार आणि तेल कंपन्यांकडे नुकसानभरपाई मागण्याची तयारी सुरू केली आहे. ३ नोव्हेंबरनंतर बॅंकांना दिवाळीच्या सुट्या असल्याने तेलाचा मुबलक साठा केला होता. दिवाळीनंतर पर्यटन वाढत असल्यानेही महामार्गांवरील पंपांवर ४५ ते ९० हजार लिटर तेलसाठा होता. दर अचानक कमी झाल्याने कोट्यवधींचा भुर्दंड बसला. नुकसानीचा तपशील गोळा करण्याचे काम पेट्रोल, डिझेल डिस्ट्रीब्यूटर्स फेडरेशनने सुरू केले आहे. ऑनलाईन फॉर्ममध्ये माहिती भरून घेतली जात आहे. 


राज्यातील साडेसहा हजार पंपांचे सरासरी तीन लाख याप्रमाणे सुमारे ३५० कोटींचे नुकसान झाल्याचा फेडरेशनचा दावा आहे. भविष्यात इंधन दरात कपात करताना किमान १५ दिवस अगोदर सूचना द्यावी, अशीही फेडरेशनची मागणी आहे.


जिल्ह्यात सात कोटींचा फटका


तीन नोव्हेंबर रोजी अचानक दर कमी केल्याने पंपचालकांना मोठे नुकसान सोसावे लागले. प्रत्येक पंपाची नुकसानीची सरासरी रक्कम तीन लाख रुपये आहे. सांगली जिल्ह्यातील २४० पंपांना सात कोटींचा फटका बसला.

Web Title: Impact on Maharashtra due to cheaper petrol and diesel in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.