केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीने प्रधानमंत्र्यांचे आत्मनिर्भरतेचे स्वप्न पूर्ण होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:32 AM2021-09-10T04:32:09+5:302021-09-10T04:32:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : केंद्राच्या योजनांची १०० टक्के अंमलबजावणी केल्यास तरुण स्वबळावर उभे राहतील. याद्वारे देशाच्या आत्मनिर्भरतेचे प्रधानमंत्र्यांचे ...

The implementation of central plans will fulfill the Prime Minister's dream of self-reliance | केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीने प्रधानमंत्र्यांचे आत्मनिर्भरतेचे स्वप्न पूर्ण होईल

केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीने प्रधानमंत्र्यांचे आत्मनिर्भरतेचे स्वप्न पूर्ण होईल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : केंद्राच्या योजनांची १०० टक्के अंमलबजावणी केल्यास तरुण स्वबळावर उभे राहतील. याद्वारे देशाच्या आत्मनिर्भरतेचे प्रधानमंत्र्यांचे स्वप्न पूर्ण होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे गुरुवारी दीपाली भोसले-सय्यद धर्मादाय संस्थेतर्फे आयोजित पूरग्रस्त भागातील तरुणींना मदतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील, अभिनेत्री दीपाली सय्यद उपस्थित होते. धर्मादाय संस्थेने पूरग्रस्त भागातील एक हजार युवतींच्या नावे प्रत्येकी ५० हजार रुपयांची ठेव ठेवली आहे. ठेवपावत्यांचे प्रातिनिधिक वितरण राज्यपालांच्या हस्ते झाले. सामूदायिक विवाहातील प्रातिनिधीक पाच जोडप्यांचा विवाहदेखील यावेळी करण्यात आला.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील तरुणांना व्यवस्थित मिळवून द्यावा. तसे झाल्यास संपूर्ण भारत आत्मनिर्भर होईल. निसर्ग आपली परीक्षा घेत आहे, या काळात सर्वांनी धैर्याने एकमेकांना मदतीचा हात दिला पाहिजे. भारतात सन्मामार्गावर चालणारे लोक, परोपकाराची परंपरा अखंड चालवत आहेत. याच परंपरेशी नाते सांगणारे काम हा ट्रस्ट करत आहे. त्यांनी इतिहासात लिहून ठेवण्यासारखे काम केले आहे. पैसे सगळेच कमवतात; पण त्याचा वापर चांगल्या कामासाठी व्हावा. दीपाली सय्यद-भोसले यांच्या कार्याचा गौरव महाराष्ट्र शासनानेही करायला हवा.

मंत्री कपिल पाटील म्हणाले की, कलाकार सामाजिक काम करताना फक्त चित्रपटातच दिसतात; पण दीपाली यांनी प्रत्यक्ष समाजसेवा केली आहे. पूरग्रस्तांना मदतीसाठी प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील ड-१ यादी प्रसिद्धीसाठी लक्ष घालू. आपत्तीग्रस्तांच्या मदतीच्या निकषांत सुधारणांसाठी आढावा बैठक घेऊ.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, आतापर्यंत तीन-चार वेळा पुराचे संकट आले आहे. दीपाली सय्यद यांचे काम लोकांचे आयुष्य उभे करणारे आहे. राज्यपालांनी स्वयंसेवक संघात काम केले आहे. त्यामुळे सेवाभावी कार्यक्रमांकडे त्यांचे लक्ष जाते. पूरग्रस्तांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ८० कोटी मागितले आहेत, त्यापैकी २९.५० कोटी मिळाले आहेत, उर्वरित पैसेही लवकरच मिळतील. पुरावर पर्यायी उपाययोजनांचा विचार करावा लागेल. पाणी वळविण्याचा विचार आमचा विभाग करतोय, त्यासाठी राज्यपालांचेही मार्गदर्शन घेऊ.

खासदार पाटील म्हणाले की, पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदतीसाठी केंद्रीय मंत्र्यांसोबत पत्रव्यवहार सुरू आहे. दिल्लीत त्यांच्या भेटीगाठीही घेतल्या आहेत.

यावेळी दीपाली सय्यद यांनी ट्रस्टच्या कामकाजाचा आढावा घेतला.

कार्यक्रमाला आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष दौलत शितोळे, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, पृथ्वीराज पाटील, संजय बाजाज आदींची उपस्थिती होती. प्रसाद मोरे यांनी आभार मानले.

चौकट

ठेवपावत्यांचे प्रातिनिधिक वाटप

राज्यपालांच्या हस्ते मयुरी किरण ढोले, सलोनी अनंत लोखंडे, स्वाती सुरेश कांबळे, सिमरन जमादार व आफरीन सय्यद-जमादार या युवतींना प्रातिनिधिक स्वरूपात कन्या साहाय्य ठेव प्रमाणपत्रांचे वाटप झाले. सामुदायिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांना राज्यपालांनी आशीर्वाद दिले.

Web Title: The implementation of central plans will fulfill the Prime Minister's dream of self-reliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.