अल्पसंख्याकांच्या प्रगतीसाठी शासन योजना प्रभावीपणे राबवू  : चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 10:58 AM2019-12-19T10:58:43+5:302019-12-19T11:04:59+5:30

अल्पसंख्याक समाजबांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न, समस्या, अडचणी सोडवण्याची शासनाची आणि प्रशासनाची भूमिका आहे. जिल्हा प्रशासनामार्फत अल्पसंख्याकांचे हक्क अबाधित राहाण्यासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. ​

Implementation of Government Scheme for Minority Development effectively: Choudhary | अल्पसंख्याकांच्या प्रगतीसाठी शासन योजना प्रभावीपणे राबवू  : चौधरी

अल्पसंख्याकांच्या प्रगतीसाठी शासन योजना प्रभावीपणे राबवू  : चौधरी

Next
ठळक मुद्देअल्पसंख्याकांच्या प्रगतीसाठी शासन योजना प्रभावीपणे राबवू  : चौधरीजिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक हक्क दिन

सांगली : अल्पसंख्याक समाजबांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न, समस्या, अडचणी सोडवण्याची शासनाची आणि प्रशासनाची भूमिका आहे. जिल्हा प्रशासनामार्फत अल्पसंख्याकांचे हक्क अबाधित राहाण्यासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त अल्पसंख्याकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव करून देण्यासाठी आयोजित कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अर्जुन बन्ने, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, शाहीन शेख, डॉ. विनोद पवार, मुनीर मुल्ला, राजगोंडा पाटील, भूपेंद्र सिंग आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे, पंथाचे लोक राहतात. या सर्वांचे हित जोपासण्यासाठी संविधानामध्ये मुलभूत हक्कांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अल्पसंख्याकांचे धार्मिक स्वातंत्र्य, शिक्षण, सांस्कृतिक आदि हक्क अधोरेखित केले गेले आहेत. याची अंमलबजावणी होण्यासाठी शासनाने वेगवेगळे कार्यक्रम सुरू केले आहेत.

यामध्ये अल्पसंख्याकांसाठी १५ कलमी कार्यक्रम हा महत्वाचा कार्यक्रम असून यामध्ये अल्पसंख्याकांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांना विविध क्षेत्रात मदत करणे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करणे, शिष्यवृत्ती, तरूणांना रोजगार देणे, अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था यांना स्वतंत्र हक्क देणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत.

अल्पसंख्याकांच्या विविध संस्थामार्फत त्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम केले जात आहे. अल्पसंख्याकांचे जे प्रश्न जिल्हापातळीवर सोडविणे शक्य आहे ते प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करू. ज्या अडचणी शासन पातळीवर आहेत त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करू, असे त्यांनी आश्वासीत केले.

अल्पसंख्याक समाजातील लोकांना शासनाने कोणकोणत्या योजना सुरू केल्या आहेत त्या माहिती होण्यासाठी व त्यांचा चांगल्या पध्दतीने वापर करून घेण्यासाठी माहिती केंद्र सुरू करण्याचे नियोजन करू असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, अल्पसंख्याक समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकास्तरावर बैठका आयोजित करण्याबरोबरच त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या त्रैमासिक बैठका प्रभावी होतील याची दक्षता घेण्यात येईल.

वैयक्तिक काही अडचणी असल्यास संबंधित अधिकारी यांना भेटावे. त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू. विविध योजनांच्या माहितीसाठी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याशी संपर्क साधावा. सर्व समाजातील चांगले उद्योजक, अधिकारी, खेळाडू, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रामध्ये ज्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे अशा व्यक्तींनी अल्पसंख्याक समाजातील लोकांना पुढे आणण्यासाठी मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी शाहीन शेख यांनी अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी प्रधानमंत्री यांच्या १५ कलमी कार्यक्रमाबाबत, डॉ. विनोद पवार यांनी अल्पसंख्यांकासाठी संविधानातील हक्क, मुनीर मुल्ला यांनी अल्पसंख्याकांच्या मागण्या व प्रश्न, राजगोंडा पाटील यांनी अल्पसंख्याक स्वयंसेवी संस्थांबाबत विविध योजना, भूपेंद्र सिंग यांनी अल्पसंख्याकांच्या अडचणी या विषयावर मार्गदर्शन करून अल्पसंख्याकांच्या समस्यांची सोडवणूक होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना करण्याबाबत आपली मते मांडली. तसेच अशासकीय सदस्य सलीम गवंडी, मुस्ताक पटेल, फैजल पटेल, नजीर जमादार यांनी मनोगत व्यक्त करून त्यांच्या समस्या मांडल्या.

प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी कार्यक्रमाचा हेतू विशद करून मान्यवरांना संविधानाची उद्देशिका देवून स्वागत केले. सूत्रसंचालन प्रा. ए. के. पाटील यांनी केले. या कार्यक्रमास अल्पसंख्याक समाजातील विविध मान्यवर, महिला, अल्पसंख्याक समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य, शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

Web Title: Implementation of Government Scheme for Minority Development effectively: Choudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.