फटाके गोदामांवर छापे; पाच लाखांचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:09 AM2017-10-18T00:09:31+5:302017-10-18T00:09:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : विनापरवाना आणि लोकवस्तीत फटाक्यांचा साठा करून त्याची विक्री करणाºया अड्ड्यांवर तसेच गोदामांवर छापे टाकण्याचे आदेश देऊनही अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात येताच, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील मंगळवारी स्वत: रस्त्यावर उतरले. सांगलीत हरिपूर रस्त्यावर छापा टाकून त्यांनी सुमारे चार लाखांचा फटाक्यांचा साठा जप्त केल्यानंतर महसूलची यंत्रणा फटाफट कामाला लागली. सांगलीच्या कारवाईनंतर मिरज, कवठेमहांकाळ, वाळवा व शिराळा तालुक्यात रात्री उशिरापर्यंत छापासत्र सुरू होते.
बुधगाव व कवलापूर (ता. मिरज) येथेही फटाके स्टॉलवर छापा टाकून एक लाखाचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. ते म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालय व गृह विभागाने लोकवस्तीत फटाके स्टॉल व तसेच गोदामात साठा करू नये, असे आदेश दिले आहेत. तरीही या आदेशाचे जिल्ह्यात पालन होताना दिसत नाही. पंधरा दिवसांपूर्वी महापालिका, पोलिस व महसूल विभागाची संयुक्त बैठक घेऊन या आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना केली होती. जिथे स्टॉल लावण्यास जागा निश्चित करुन दिली आहे, तिथेच स्टॉल लागले पाहिजेत, असेही सांगितले होते. शहरात लोकवस्तीत कुठेही स्टॉल लावू नयेत, असेही सांगितले होते.
काळम-पाटील म्हणाले की, महापालिकेने सोमवारी पाच पथके तयार करून तपासणी सुरू केली. मिरजेत सहा ते सात विक्रेत्यांनी लावलेले स्टॉल बंद करून ते जागा निश्चित करुन दिलेल्या ठिकाणी हलविले; पण सांगलीत असे कोठेच घडले नाही. फटाके स्टॉल व गोदामाबाबत मंगळवारी सकाळी पुन्हा बैठक घेतली. पोलिस अधिकारी, महापालिका व महसूलचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आढावा घेतला; पण अधिकाºयांनी सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे सांगितले. तरीही त्यांनी दुपारी १२ ते २ या वेळेत आढावा घ्यावा.
अनधिकृत स्टॉल किंवा गोदामात फटाके ठेवले असतील तर ते हलविण्यात यावेत; अन्यथा मी स्वत: छापा टाकणार, असा ‘अल्टिमेटम’ दिला होता. हरिपूर रस्त्यावर काळीवाट येथे महादेव पाटणे याने त्याच्या स्वत:च्या जागेत मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा केल्याची माहिती मिळाली. त्याचे नाव व पत्ता लिहून एका पथकास कारवाई करण्यास सांगितले.
जिल्हाभर छापे
जिल्हाधिकारी स्वत: छापे टाकत असल्याचे समजताच पोलिस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने शिराळा, कवठेमहांकाळ, वाळवा, मिरज, तासगाव तालुक्यात छापे टाकले. रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरु होती. त्यामुळे कारवाईचा सविस्तर तपशील मिळू शकला नाही. सांगलीत जप्त केलेला फटाक्यांचा साठा बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे ठेवण्यात आला आहे. बुधगाव, कवलापूर येथील प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी छापे टाकून एक लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे.
परवाने रद्द करणार
दिवाळीसाठी फटाके विक्री तसेच गोदामात फटाक्यांचा साठा करण्यास ज्यांना परवाने दिले आहेत, त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई दिवाळी झाल्यानंतर केली जाईल. यापुढे शहरात कुठेही लोकवस्तीत फटाके स्टॉल व गोदामे दिसून आली, तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
सणाचा आधार घेऊ नका!
काळम-पाटील म्हणाले की, दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे. हा सण फटाके फोडून साजरा करण्यास आमचा विरोध नाही. फटाके विक्रीलाही विरोध नाही. पण सणाचा आधार घेऊन लोकवस्तीत फटाके स्टॉल व फटाक्यांचे गोदाम करणे अत्यंत चुकीचे आहे. नियम पाळावेत, एवढेच माझे म्हणणे आहे. लोकांच्या जीविताशी कोणीही खेळू नये. प्रशासनाला कोणी कायदा शिकविण्याचा प्रयत्न करु नये. पंधरा दिवसांपूर्वी कारवाईबाबतचा आदेश देऊनही यंत्रणा हलली नाही. शेवटी मला रस्त्यावर उतरावे लागले. मी छापा टाकल्याचे समजताच यंत्रणा कामाला लागली.