सदोष गतिरोधक ठरताहेत जीवघेणे; नियमांना हरताळ, महापालिकेचे दुर्लक्ष
By शीतल पाटील | Published: October 16, 2023 01:53 PM2023-10-16T13:53:50+5:302023-10-16T13:55:23+5:30
नेमके कसे असावे गतिरोधक
शीतल पाटील
सांगली : वाहनाचा वेग नियंत्रित राहावा, हा गतिरोधक उभारण्याचा उद्देश असला, तरी सदोष आणि अशास्त्रीय पद्धतीने ठिकठिकाणी उभारण्यात आलेले गतिरोधक वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. शहरात सर्वत्र गतिरोधक करताना लांबी, रुंदी, उतार, उंचवटा या कोणत्याही निकषाचे पालन होत नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे रस्तानिहाय गतिरोधकाचा आकार, लांबी-रुंदी, उतार आणि उंचवटा बदलत असून, गतिरोधक म्हणजे रस्त्यावरील टेंगूळ ठरत आहेत. परिणामी सदोष गतिरोधकांमुळे काहींना जीव गमवावा लागला, तर काही जण कायमचे जायबंदी झाले आहेत.
गतिरोधक कसे असावे, यासाठी काही नियम आहेत; पण त्याचा विचार न करता शहरात मुख्य रस्ता असो, अंतर्गत रस्ते असोत अथवा अगदी गल्लीबोळांत रस्ता असो..सर्व नियम धाब्यावर बसवून वाट्टेल तसे गतिरोधक टाकून ठेवण्यात आले आहेत. या गतिरोधकामुळे गेल्या काही दिवसांत शहरात जीवघेणे अपघातही घडले. शनिवारी रात्री आयकर भवनजवळील गतिरोधकावर दुचाकी आढळून झालेल्या अपघातात विजय मगदूम या व्यक्तीचा बळी गेला. खरे तर गतिरोधक अपघात टाळण्यासाठी बनविले गेले असले तरी सदोष गतिरोधकामुळे नेमके उलट घडत आहेत. वाहने तर खराब होतातच, शिवाय वाहनचालकांनाही इजा होते.
महापालिका म्हणते..लोकच गतिरोधक बनवितात
शहरातील अंतर्गत रस्ते, गल्लीबोळांतही गतिरोधक आहेत. हे गतिरोधक वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरत आहे. याबाबत शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांना विचारता ते म्हणाले की, रस्त्याची कामे करताना अनेक ठिकाणी स्थानिक लोकच गतिरोधकाची मागणी करतात. त्याशिवाय कामच करू देत नाहीत. राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्गावर गतिरोधकासाठी एक समिती आहे; पण महापालिकेच्या रस्त्यासाठी नियम असतील तर ते तपासून घ्यावे लागतील.
नेमके कसे असावे गतिरोधक
किमान दोन ते तीन फुटांचा स्लोप गतिरोधकाला असावा. शाळा, महाविद्यालये, गर्दीची ठिकाणे अशा ठिकाणी गतिरोधक केला जातो. महामार्ग, राज्य मार्गावर पांढरे पट्टे असलेले दिशादर्शक गतिरोधक असावेत. याखेरीज तयार केलेले कुठलेही गतिरोधक अनधिकृत व धोकादायक असतात.
ना पांढरे पट्टे, ना फलक
शहरातील अंतर्गत रस्ते चकाचक झाले आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार नगरसेवक, आमदारांनी ठेकेदाराकडून गतिरोधकही उभारले आहेत. पण त्या गतिरोधकावर ना पांढरे पट्टे आहेत, ना कुठे फलक. रात्रीच्यावेळी गतिरोधक दिसतच नाही. असे धोकादायक गतिरोधक अपघातांना निमंत्रण देत आहेत.
आमदार, जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर धोकादायक गतिरोधक
आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विश्रामबाग येथील कार्यालयासमोरही गतिरोधक आहे. त्या गतिरोधकाबाबतही नियम धाब्यावर बसविले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोरचा गतिरोधक तर अतिशय धोकादायक आहे. शास्त्री चौक ते मारुती चौक, पंचमुखी मारुती रोड, आयकर भवन रोड, चांदणी चौक ते शंभरफुटी, टिंबर एरिया अशा कित्येक रस्त्यावरील गतिरोधक चुकीच्या पद्धतीने उभारले आहेत.