कुपवाड तलाठी कार्यालयातील कारभार सुधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:28 AM2021-01-25T04:28:32+5:302021-01-25T04:28:32+5:30
कुपवाड : शहरातील तलाठी कार्यालयात गोरगरीब नागरिक, विद्यार्थी, शेतकरी यांची गेल्या अनेक वर्षांपासून कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांचे ...
कुपवाड : शहरातील तलाठी कार्यालयात गोरगरीब नागरिक, विद्यार्थी, शेतकरी यांची गेल्या अनेक वर्षांपासून कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी कामात सुधारणा न केल्यास या दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी दिला आहे.
प्रा. पाटील म्हणाले, कुपवाड तलाठी कार्यालयात गेल्या काही वर्षांपासून अंदाधुंद कारभार सुरू आहे. तलाठी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे गोरगरीब सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आदी नागरिकांची विविध कामे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. तसेच ज्या नागरिकांची कामे प्रलंबित आहेत. त्यांना तलाठी कार्यालयातून टोकन दिले जात नाही. त्यामुळे अनेक प्रस्ताव, कागदपत्रे गहाळ झाली आहेत. नागरिकांनी प्रलंबित कामाबाबत तलाठी व कोतवाल यांच्याकडे विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊन नागरिकांना पिटाळून लावतात.
तलाठी कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट वाढला आहे. तलाठी व मंडल अधिकारी यांच्या मर्जीतील एजंटांची मात्र कामे वेळेवर व दररोज होतात. वृध्द व सर्वसामान्य नागरिकांची कामे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यांनी वारंवार हेलपाटे मारूनही तलाठी कार्यालयात त्यांची दखल घेतली जात नाही. याची तक्रार माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी त्या त्या वेळेच्या तहसीलदारांकडे केली होती. त्यांना कुपवाड तलाठी कार्यालयातील चालणाऱ्या अनागोंदी कामाविषयी लक्ष घालण्याची विनंती केली होती. परंतु त्यात अद्यापही कोणताही बदल झालेला दिसून येत नाही.
पाटील म्हणाले, कुपवाड कार्यालयात गोरगरिबांची कामे करणारा व पूर्णवेळ तलाठी नेमावा. फोफावत चाललेली एजंटगिरी थांबवावी, वेळेचे बंधन, अर्जदारास टोकण देणे बंधनकारक करा, कोतवालांची बदली करा. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली. ज्या नागरिकांची कामे प्रलंबित आहेत. त्या नागरिकांनी कुपवाड येथील जनता दलाच्या कार्यालयात संपर्क साधावा.