‘भूपाळी ते भैरवी’ला सखींची उत्स्फूर्त दाद
By admin | Published: November 9, 2014 10:56 PM2014-11-09T22:56:49+5:302014-11-09T23:27:06+5:30
‘लोकमत’ सखी मंचचा उपक्रम : सांगलीमध्ये रंगली लोकगीतांची मैफल
सांगली : आपल्या पारंपरिक लोककलांद्वारे लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या लोकप्रिय ‘भूपाळी ते भैरवी’ या कार्यक्रमास सखी मंच सदस्यांनी भरभरून दाद दिली. ‘लोकमत’ सखी मंचच्यावतीने सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. जिव्हाळा निर्मित, संपत कदम प्रस्तुत ‘भूपाळी ते भैरवी’ कार्यक्रमाचा हा १०६ वा प्रयोग होता. हरवत चाललेल्या लोककला, नृत्य, नाट्य या अभिनयाने खुलत गेल्या.
भल्या पहाटेची भूपाळी, जात्यावर दळण दळताना गायिली जाणारी ओवी, भल्या पहाटे कुडमुड्याच्या निनादात व्हणार सांगत येणारा ‘पिंगळा’ जोशी, अठरा पिढ्यांचा इतिहास सांगणारा हेळवी, लोकसंस्कृतीचा उपासक वासुदेव, खदखदून हसवणारा बहुरूपी, अंगावर आसूड ओढणारा पोतराज, कडकलक्ष्मीवाला, नटखट गवळण, विनोदातून अध्यात्म सांगणारं भारूड, लोकनाट्यातील खुसखुशीत बतावणी, ढंगदार लावणी, मोटेवरचं गीत, नंदीबैल, कोळीनृत्य, आदिवासी नृत्य, धनगरी ओव्या, एकात्मतेची नाळ जोडणारी भैरवी आदींचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमात कृष्णात पाटोळे, मिलिंद कांबळे, सिकंदर पिरजादे, नरेंद्र हराळे, बाळासाहेब गणे, महेश नवाळे, अभिजित कदम, अवधुत माने, संजय घोलप, अविनाश कोठावळे, हेमंत पवार, जयश्री जाधव, वैष्णवी जाधव, वर्षा मंत्री, वर्षा जाधव, अबोली कदम व सुमित अॅकॅडमी आदी कलाकारांचा समावेश होता.
यावेळी सखी मंचच्या कमिटीच्या सदस्या जया जोशी, माया शितोळे, मीनल कुडाळकर, पद्मा मस्के, पार्थ हॉलिडेजचे मुकुंद माने व सुहास डोंगरे, सुमीत साळुंखे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)