भिलवडीत राष्ट्रगीताने होतो कामाचा श्रीगणेशा; राज्यातील एकमेव गाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 12:42 PM2022-01-26T12:42:07+5:302022-01-26T12:45:10+5:30

Sangli : राष्ट्रगीत संपले की ‘भारत माता की जयऽऽ’ असा जयघोष होतो आणि नागरिकांच्या दिवसाची सुरुवात राष्ट्रीय प्रेरणा घेऊन होते.

In Bhilwadi of Sangli, the national anthem marks the beginning of work; The only village in the Maharashtra | भिलवडीत राष्ट्रगीताने होतो कामाचा श्रीगणेशा; राज्यातील एकमेव गाव

भिलवडीत राष्ट्रगीताने होतो कामाचा श्रीगणेशा; राज्यातील एकमेव गाव

googlenewsNext

- शरद जाधव

भिलवडी : ‘व्यापारी आणि ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो... आजचा दिनविशेष... आजच्या दिवसाची सुरुवात करूया या छानशा गीताने...’ असे म्हणत गाणे संपेपर्यंत घड्याळाचा काटा बरोबर ९ वाजून १० मिनिटांवर येतो... यानंतर ‘परेड सावधान... एक साथ राष्ट्रगीत शुरू कर...’ अशी सूचना येते आणि भिलवडीत जिथे जिथे हा आवाज पोहोचतो तेथील सर्व नागरिक सावधान स्थितीत उभे राहतात आणि राष्ट्रगान सुरू करतात. एवढेच नाही तर रस्त्यावरील छोट्या- मोठ्या वाहनांचे ब्रेकही उत्स्फूर्तपणे लागतात.

राष्ट्रगीत संपले की ‘भारत माता की जयऽऽ’ असा जयघोष होतो आणि नागरिकांच्या दिवसाची सुरुवात राष्ट्रीय प्रेरणा घेऊन होते. एखाद्या शाळा, हायस्कूलचा जसा परिपाठ चालतो, तसे या उपक्रमांमधील सातत्य एखाद्या नंदादीपाप्रमाणे अखंडित टिकवण्यात भिलवडी व्यापारी संघटना यशस्वी झाली आहे. १५ ऑगस्ट २०२० रोजी कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे होणारी व्यापाऱ्यांची ससेहोलपट लक्षात घेता ‘एकी में नेकी है...’ या सूत्रानुसार सर्व छोटे-मोठे साडेचारशे व्यापारी एकत्रित आले. व्यापाऱ्यांच्या न्याय्य व हक्कांबरोबरच सामाजिक कामातही योगदान देण्याच्या विचारातून राष्ट्रगीताने दिवसभराच्या कामाची सुरुवात करणारा हा उपक्रम आकारास आला.

नागरिकांच्या हितासाठीच्या विविध सूचना, केलेल्या आवाहनानुसार कित्येक हरवलेल्या वस्तू सापडू लागल्या. कोरोना काळात तीन ऑक्सिजन मशीनची उपलब्धी झाली. विक्रमी लसीकरण, कोविड सेंटरला आर्थिक मदत, २०२० मध्ये १५८ आणि २०२१ मध्ये २१६ इतके विक्रमी रक्तदान, कोरोनामुक्त रुग्णांच्या मुलाखती यूट्यूबवरून प्रसारित करून समाजाला मानसिक आधार देणे, भिलवडी घाटावर दीपोत्सव, किल्ला स्पर्धा, कोविड योद्धे, जवानांचा सत्कार आदी उपक्रम राबविले गेले. भिलवडी व्यापारी संघटनेचे सर्व संचालक आणि व्यापारी वर्गाचे या उपक्रमास मोलाचे सहकार्य लाभत आहे.

भिलवडी महाराष्ट्रातील एकमेव गाव
तेलंगणा राज्यातील एका गावात असाच उपक्रम राबविला जाताे; पण तेथे फार काळ सातत्य राहिले नाही. त्यामुळे असा राष्ट्रीय उपक्रम राबविणारे भिलवडी भारतातील दुसरे, तर महाराष्ट्रातील पहिले गाव ठरले आहे. येथील राष्ट्रगीताचा व्हिडिओ फेसबुक, व्हॉट्सॲप, यूट्यूब आदी सोशल मीडियांतून व्हायरल झाला आहे. काेट्यवधी लाेकांना तो आवडलाही आहे.

Web Title: In Bhilwadi of Sangli, the national anthem marks the beginning of work; The only village in the Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली