इस्लामपुरात गुंडाचा डोक्यात शस्त्राचे वार आणि दगड घालून खून
By श्रीनिवास नागे | Published: June 7, 2023 11:36 AM2023-06-07T11:36:55+5:302023-06-07T11:38:31+5:30
तीन ते चार हल्लेखोरांचा समावेश
इस्लामपूर : इस्लामपूर शहरात गुन्हेगारीतील वर्चस्ववाद आणि टोळीयुद्धातून रात्री ११ च्या सुमारास बहे रस्त्यावरील रिंग रोडवर २७ वर्षीय गुंडाचा डोक्यात, चेहऱ्यावर धारदार हत्याराने वार करत आणि दगड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली. बारमध्ये झालेल्या वादावादीनंतर बाहेर पडल्यावर या गुंडाचा खून करण्यात आला
प्रकाश महादेव पुजारी (२७, रा.औद्योगिक वसाहत, दूध संघाच्या पाठीमागे, इस्लामपूर) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंड आहे. त्याच्याविरुद्ध खंडणी आणि गंभीर शारीरिक दुखापत करण्याच्या गुन्ह्यांची नोंद आहे. यातील हल्लेखोर हे मोक्का कारवाईतून जामीनावर बाहेर आल्याची चर्चा आहे. तसेच हा खून वर्चस्ववादातून घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
प्रकाश उर्फ पक्या पुजारी या नावाने खून झालेला गुंड गुन्हेगारी वर्तुळात परिचित होता. मंगळवारी रात्री तो बहे रस्त्यावरील एका बारमध्ये बसला होता. त्यावेळी संशयीत हल्लेखोरही त्याच बारमध्ये आले होते. तेथे त्यांच्यात वादावादी झाली. तेथून बाहेर बसल्यावर रस्त्याकडेच्या अंधारात त्यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली. त्यातून हल्लेखोरांनी धारदार हत्याराने त्याच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर वार केले. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून पोबारा केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुजारी याला जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र गंभीर दुखापत पाहून त्याला पुढे पाठविण्यात आले. यादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. पहाटे येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याचे शव विच्छेदन करण्यात आले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. शहरात पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची चिन्हे दिसत आहेत. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकही दाखल झाले आहे. याबाबत रोहन रविंद्र इचुर याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार गजराज पाटील, सागर म्हस्के, अकिब पटेल आणि एका अनोळखी विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.