इस्लामपुरात एका मुलासाठी दोन मैत्रिणींची हाणामारी, महाविद्यालयाच्या दारातच भिडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 11:14 PM2023-10-14T23:14:39+5:302023-10-14T23:15:16+5:30
मुलगा चालवतो कॉफी शॉप, प्राचार्यांनी दोन्ही मुलींना दाखले दिले हातात
लोकमत न्यूज नेटवर्क, इस्लामपूर: एका कॉफी शॉप चालविणाऱ्या मुलासाठी एकाच वर्गात शिकणाऱ्या दोन मैत्रिणी एकमेकींशी भिडल्या आणि या प्रकरणाचा विस्फोट झाला. दोघी वाळवा तालुक्याच्या वेगवेगळ्या गावातील मात्र इस्लामपुरातील एका महाविद्यालयात शास्त्र शाखेच्या पदवीच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत होत्या.
एकाच वर्गात असल्याने सर्व चालणे-बोलणे, एकमेकीला प्रत्येक गोष्ट सांगणे, असा शिरस्ता दोघींमध्ये होता. महाविद्यालयातून घरी जाण्यासाठी बसस्थानकावर येईपर्यंत दोघी सोबत असायच्या. त्यातून त्या स्थानक परिसरातील एका कॉफी शॉपमध्ये जायच्या. तेथे जाता जाता त्यातील एकीचा कॉफी शॉप चालविणाऱ्या मुलावरच जीव जडला आणि दोघातील डेटिंग सुरू झाले. ही बाब मैत्रिणीला माहीत होती. काही दिवसांनी पहिल्या मैत्रिणीचा त्या मुलाशी काडीमोड झाला आणि दुसरी मैत्रीण अलगद त्याच्या नादी लागली. दोघातील फोनाफोनीची कुणकुण पहिलीला लागली अन तिथेच तिचा जळफळाट झाला.
दोघींच्या मैत्रीत बिब्बा घालणारा तो मात्र नामानिराळा राहिला. बुधवारी दुपारी भर बाराच्या सुमारास शिकत असलेल्या महाविद्यालयाच्या दारातच या दोघी एकमेकींशी अशा भिडल्या की पाहणारांचे डोळे विस्फारून गेले. झिंझ्या ओढत, गुद्दे घालत दोघींची हाणामारी झाली. त्यात एकीची बहिणसुद्धा हाणामारी करण्यासाठी सरसावली. या दारातील घटनेची माहिती प्राचार्यांपर्यंत पोहचल्यावर त्यांनी ही माहिती पोलिसांच्या निर्भया पथकाला दिली. गुरुवारी पुन्हा हा भडका उडणार होता. त्यापूर्वीच प्राचार्यांनी या मुलींना पालकांसह बोलावून घेत घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. दोघींनी त्यांना ताकास तूर लागू दिला नाही. मग पोलिसांची ट्रीटमेंट सुरू झाल्यावर हळूहळू या प्रेमाच्या त्रिकोणाचा उलगडा झाला प्राचार्यांनी तीन मुलींचे दाखले त्यांच्या हातात देत त्यांना महाविद्यालयातून काढून टाकण्याची कारवाई पूर्ण केली.